मराठा आरक्षण सर्वेक्षण करताना लोकसंख्येच्या आकड्यात तफावत
By विकास राऊत | Published: February 1, 2024 07:23 PM2024-02-01T19:23:14+5:302024-02-01T19:23:40+5:30
कर्मचाऱ्यांसोबत अनेक ठिकाणी वाद : विभागातील काम ७० टक्क्यांवर
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजासह खुल्या प्रवर्गाचे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेनुसार राज्यासह मराठवाड्यात सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षणात काही जिल्ह्यांच्या लोकसंख्येच्या आकडेवारीत तफावत आढळल्यामुळे किती टक्के काम पूर्ण झाले, याचा ताळमेळ बसत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, विभागीय प्रशासनाने ७० टक्के सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्याचा दावा केला असून दोन दिवस मुदतवाढ मिळाल्यामुळे उर्वरित काम पूर्ण होईल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी ३ वा. न्या. शिंदे समिती सर्वेक्षण पाहणी आणि जातनिहाय लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचाऱ्यांच्या माहितीबाबत ऑनलाईन आढावा घेणार आहे.
जालना, नांदेड, परभणी या जिल्ह्यातील २०११ ची जनगणना आणि सध्या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने दिलेल्या आकडेवारीमध्ये फरक आढळला आहे. तसेच कर्मचाऱ्यांसोबत नागरिक वाद घालण्याच्या घटना काही जिल्ह्यात हाेत आहेत. जिल्हा पातळीवर स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी येत आहेत. अद्याप आयुक्तालयापर्यंत काही माहिती प्राप्त झालेली नाही.
विदर्भात काही ठिकाणी सर्वेक्षण करणाऱ्यांनी पोलिस सुरक्षेची मागणी केली आहे. मराठवाड्यात अद्याप अशी कुठलीही मागणी समोर आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या गृहीत धरून सर्वेक्षण केले जात असल्याचे विभागातील जिल्ह्यांनी कळविले आहे. त्यात काही जिल्ह्यांनी लोकसंख्येचा आकडा चुकीचा टाकला आहे. त्यामुळे जिल्ह्यांनी सर्वेक्षणाची दिलेली आकडेवारी देखील कितपत सत्य आहे, याबाबत काही शंका उपस्थित होत आहे.
सगळी लपवाछपवी सुरू ....
दोन दिवसांपूर्वी मागासवर्गीय आयोगाने घेतलेल्या बैठकीतही कोणत्या जिल्ह्यात किती सर्वेक्षण झाले. याची थेट माहिती समोर येऊ दिली नाही. मराठा समाजासह खुल्या प्रवर्गाचा सर्व्हे करण्याच्या सूचना आहेत. विभागात खुल्या प्रवर्गाची जातीनिहाय किती कुटुंब आहेत, प्रगणकांनी किती ठिकाणी भेटी दिल्या, याची कुठलीही माहिती स्थानिक पातळीवरून बाहेर येऊ दिली जात नाही. ही सगळी लपवाछपवी कशासाठी सुरू आहे, असा प्रश्न आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यांची लोकसंख्या...
छत्रपती संभाजीनगर : ३७ लाख १ हजार २८२
नांदेड : ३३ लाख ६१ हजार २९२
बीड : २५ लाख ८६ हजार २५८
लातूर : २४ लाख ५४ हजार १९६
जालना : १९ लाख ५९ हजार ४६
परभणी : १८ लाख ३६ हजार ८६
धाराशिव : १६ लाख ५७ हजार ५७६
हिंगोली : ११ लाख ७७ हजार ३४५
लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचाऱ्यांची माहिती घेणार
गुरुवारी दुपारी ३ वा. मराठा आरक्षण अनुषंगाने गठित केलेल्या सेवानिवृत्त न्या. शिंदे समिती सर्वेक्षण अनुषंगाने बैठक घेणार आहे. विभागात जातनिहाय लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे. याची माहिती संकलित करण्याबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच विभागातील सर्वेक्षण आकडेवारीचाही आढावा घेण्यात येणार आहे.
यामुळे काही जिल्हे मागे पडले....
मराठवाड्यात चार महापालिका आहेत. जालना मनपा नव्याने होत आहे. शहरातील सर्व्हेक्षण आणि जिल्ह्यातील सर्व्हेक्षणाचे आकडे वेगवेगळे दिसत आहेत. तसेच मराठवाड्यात काही जिल्ह्यांना पाच दिवस उशिरा प्रगणक मिळाले. त्यामुळे सर्व्हेक्षणात काही जिल्हे मागे पडल्याचे दिसते आहे. नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या ३१ लाख, तर जालन्याची १८ लाख दाखविण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरची लोकसंख्या ३७ लाख १ हजार २८२ दाखविली आहे. इतर जिल्ह्यांनी आकडे अजून दिलेले नाहीत. ९ दिवसांत सर्व्हेक्षण पूर्ण होणे अवघड असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.