विविध विमान कंपन्यांची सोमवारी शहरात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:37 AM2018-07-12T00:37:58+5:302018-07-12T00:39:11+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सकाळी अकरा वाजता देशांतर्गत सेवा देणाऱ्या सर्व प्रमुख विमान कंपन्या, जिल्ह्यातील उद्योग-व्यापार संघटना, लोकप्रतिनिधी, राज्य सरकारचा पर्यटन विभाग, जिल्हाधिका-यांची संयुक्त बैठक नागरी उड्डयन मंत्रालयाच्या सहसंचालिका उषा पाधी आणि रुबिना अली, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सकाळी अकरा वाजता देशांतर्गत सेवा देणाऱ्या सर्व प्रमुख विमान कंपन्या, जिल्ह्यातील उद्योग-व्यापार संघटना, लोकप्रतिनिधी, राज्य सरकारचा पर्यटन विभाग, जिल्हाधिका-यांची संयुक्त बैठक नागरी उड्डयन मंत्रालयाच्या सहसंचालिका उषा पाधी आणि रुबिना अली, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सध्या औरंगाबाद येथून मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद या शहरांना जोडणारी एअर इंडिया आणि जेट एअर लाईन्स कंपनीची हवाईसेवा आहे. सोमवारी होणाºया बैठकीत एअर इंडिया, जेट एअरवेज, विस्तारा एअर लाईन्स, गो एअर, डेक्कन एअरलाइन्स आदी डोमेस्टिक कंपन्या सहभागी होणार आहेत.
केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेंतर्गत औरंगाबादची कनेक्टिव्हिटी कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी इत्यादी ठिकाणी असावी यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. औरंगाबाद विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याबाबतही चाचपणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी जयपूर-उदयपूर-दिल्ली, तसेच बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद या प्रमुख शहरांसह औरंगाबाद राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट सर्किटमध्ये समाविष्ट केल्यास पर्यटकांचा ओघ वाढेल, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे खा. दानवे यांनी सांगितले.
बहुतांश चिनी, जपानी, श्रीलंकन पर्यटक अजिंठा, वेरूळ पाहण्यासाठी येतात, त्यामुळे औरंगाबाद हे विमानतळ बुद्धिस्ट सर्किटला जोडले गेल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची जागृती होईल.
मुंबई विमानतळाला
पर्याय ठरणार
मुंबई विमानतळावरील गर्दीला पर्याय म्हणून, तसेच जागेअभावी काही विमाने अहमदाबाद येथे उतरवावी लागतात. अहमदाबादच्या तुलनेत औरंगाबाद मुंबईपासून जवळ आहे. तेथे मुक्कामासाठी येणारी विमाने औरंगाबादेत उतरवली जाऊ शकतात का, याचीही शक्यता तपासली जाईल. औरंगाबाद येथून विविध शहरांसाठी हवाई सेवा सुरू करता येईल या पयार्याची तपासणी करण्याची मागणी खा. दानवे यांनी केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.