विविध आंब्यांचा बाजारात दरवळ, पण आमरस खवय्यांना अक्षय्य तृतीयेची प्रतीक्षा
By प्रशांत तेलवाडकर | Published: April 4, 2024 06:03 PM2024-04-04T18:03:54+5:302024-04-04T18:06:28+5:30
अजूनही मोठा वर्ग असा आहे, जो अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवासमोर आंब्याचा नैवेद्य दाखवून नंतरच आमरस खाण्यास सुरुवात करतात.
छत्रपती संभाजीनगर : विविध आंब्यांचा दरवळ बाजारात पसरू लागला आहे. काहींनी महिनाभर आधीपासूनच आंबे खाण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अजूनही अनेक ग्राहक असे आहेत की, ते अक्षय्य तृतीयेपासून आमरस खाण्यास सुरुवात करतात. मात्र, यास आणखी महिनाभराचा अवधी बाकी आहे. तोपर्यंत खवय्यांना उत्तम आंब्यांची प्रतीक्षा आहे.
साधारणत: फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात आंब्यांचे आगमन होते. ज्या किमतीत आंब्याची पहिली पेटी मिळेल त्या भावात खरेदी करणाऱ्या खवय्यांची संख्या शहरात कमी नाही. जसजसे आंबे बाजारात उपलब्ध होऊ लागले तसतसे रसाळी सुरू झाली आहे. चार ते पाच चवीचे आंबे बाजारात असून भावही आवाक्यात असल्याने आंब्यांची विक्री वाढली आहे. मात्र, अजूनही मोठा वर्ग असा आहे, जो अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवासमोर आंब्याचा नैवेद्य दाखवून नंतरच आमरस खाण्यास सुरुवात करतात.
४४ दिवस मनसोक्त आंब्यावर मारा ताव
अनेक कुटुंबांत परंपरा आहे की, अक्षय्य तृतीयेला आमरस खाण्यास सुरुवात करतात व वटपौर्णिमेनंतर आंबे खाण्यास बंद करतात. १० मे रोजी अकय्य्य तृतीया व २१ जूनला वटपौर्णिमा आहे. ४४ दिवस हे खवय्ये आंब्यावर मनसोक्त मारू शकतात. मात्र, या खवय्यांना आणखी महिनाभर आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे.
कोणते आंबे बाजारात
रमजान महिना सुरू असून रोजे (उपवास) सोडण्यासाठी आमरस खाल्ला जातो. यामुळे आंब्यांना मोठी मागणी आहे. बाजारात बदाम, केशर, लालबाग, मलाईका व हापूस असे पाच जातीचे आंबे सध्या बाजारात विकले जात आहे. केशर आंबा कर्नाटक राज्यातून येत आहे. आपल्याकडील अस्सल केशर आंबा मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात बाजारात दाखल होईल.
काय भावात मिळतोय आंबा
प्रकार भाव
१) बदाम १२०-१५० रु
२) केशर १८०-२००रु
३) लालबाग १००-१२०रु
४) मलाइका १५०-१६०रु
हापूस आंब्याचा भाव उतरला
सध्या बाजारात रत्नागिरी, देवगड तसेच कर्नाटक, हैदाबाद येथून हापूस आंबा विक्रीला येत आहे. अस्सल खवय्येच रत्नागिरी व देवगडचे आंबे ओळखू शकतात. १० दिवसांपूर्वी ९०० ते १२०० रुपये प्रति डझनने विक्री होणारा हापूसची आवक वाढताच भाव कमी होऊन सध्या ६५० ते १ हजार रुपये प्रति डझन विकत आहे.