विविध समाज,शिक्षक,हमाल,माथाडींचे मोर्चे

By Admin | Published: October 4, 2016 12:33 AM2016-10-04T00:33:35+5:302016-10-04T00:49:22+5:30

औरंगाबाद : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीवर विविध पक्ष, समाज, संघटना मोर्चे घेऊन धडकणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाची औरंगाबादेतील बैठक अचानक ठरली.

Various societies, teachers, hamals, Mathadi factions | विविध समाज,शिक्षक,हमाल,माथाडींचे मोर्चे

विविध समाज,शिक्षक,हमाल,माथाडींचे मोर्चे

googlenewsNext


औरंगाबाद : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीवर विविध पक्ष, समाज, संघटना मोर्चे घेऊन धडकणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाची औरंगाबादेतील बैठक अचानक ठरली. एरव्ही या बैठकीवर किमान ५० मोर्चे धडकत असतात. यावेळीदेखील मराठवाड्यातील विविध पक्ष, समाज, संघटना आपल्या मागण्यांसाठी बैठकीवर मोर्चे काढणार आहेत.
मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविला जाईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचाराच्या वेळी केली होती; परंतु आतापर्यंत अनेक बैठका होऊनसुद्धा हा प्रश्न सोडविता आलेला नाही. केवळ मते मिळविण्यासाठी धनगर समाजाचा वापर करण्यात आल्याचा आरोप यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर यांनी केला आहे. आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, या मागणीसाठी मंत्रिमंडळ बैठकीवर ‘एल्गार’ मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सोन्नर यांनी सांगितले.
ल्ल ल्ल ल्ल उर्दू शिक्षक संघटना
अल्पसंख्याक विद्यार्थी आणि उर्दू शिक्षकांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अ. भा. उर्दू शिक्षक संघटनेतर्फे मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढला जाईल. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष इल्हाजोद्दीन फारोकी यांच्या अध्यक्षतेखाली चंपाचौक येथून सकाळी ११ वाजता मोर्चा निघेल. अल्पसंख्याक शाळांना डोंगरी व आदिवासी शाळांप्रमाणे सवलती द्याव्यात, उर्दू शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, ‘नो वर्क, नो पेमेंट’ हा जाचक अध्यादेश अल्पसंख्याक शाळांपुरता रद्द करावा, आदी मागण्यांसाठी मोर्चा काढला जाणार असल्याचे संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख शेख जकिरोद्दीन यांनी कळविले आहे.
ल्ल ल्ल ल्ल आयटक
अंगणवाडी सेविकांना आॅनलाईन माहिती भरण्याची सक्ती करू नये, या मागणीसाठी आयटकतर्फे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करून मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात सहभागी होण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सकाळी ११ वाजता जि. प. कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. राम बाहेती, अनिल जावळे, विलास शेंगुळे, मीरा अडसरे, शीला साठे, शालिनी पगारे, चंचल खंडागळे, माया भिवसाने यांनी केले आहे.
ल्ल ल्ल ल्ल लेबर युनियन
शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा, या मागणीसाठी मराठवाडा लेबर युनियनच्या नेतृत्वाखाली हमाल-माथाडी कामगारांचा मोर्चा मंत्रिमंडळ बैठकीवर धडकणार आहे. शहागंज येथील गांधी पुतळ्यापासून सकाळी ११ वाजता निघणाऱ्या मोर्चात हमाल, माथाडी कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य उपाध्यक्ष सुभाष लोमटे, अ‍ॅड. विष्णू ढोबळे, अ‍ॅड. डी. आर. शेळके, अ‍ॅड. कृष्णा हरिदास, अ‍ॅड. सुभाष गायकवाड, देवीदास कीर्तिशाही यांनी केले आहे.
ल्ल ल्ल ल्ल अनुदान हक्क मोर्चा
महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेतर्फे मंत्रिमंडळ बैठकीवर अनुदान हक्क मोर्चा काढला जाणार आहे.
क्रांतीचौकातून सकाळी ११ वाजता मोर्चा निघेल. मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे राज्याध्यक्ष प्रकाश सोनवणे, योगेश पाटील, वसंत राठोड, अभिलाष सोनवणे, गंगाधर घुले, विलास देव, सुधाकर पगारे, चांगदेव औताडे, स्नेहलता हिवर्डे, राजकुमार पैठणे, अभिजित सोनवणे, भारत म्हस्के यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य विनाअनुदान कृती समितीच्या वतीने मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीवर आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात शाळा बंद ठेवून संस्थाचालक व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थाचालक महामंडळाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी केले आहे. या मोर्चात मुख्याध्यापक संघाचे मोहन सोनवणे, युनूस पटेल, मनोहर सुरगुडे, काँग्रेस शिक्षक सेलचे मनोज पाटील, थॉमस खरात, बी. पी. कराळे, पंढरीनाथ शिंदे, पंडित डोंगरे, ललित कला शिक्षक संघटनेचे प्रल्हाद शिंदे, राजेश निंबेकर, विजय काथार, समशेर पठाण, विजय महाजन, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे मिर्झा सलीम बेग, कादरी परवेज, मुख्तार कादरी, शिक्षक सेनेचे नामदेव सोनवणे, दत्ता पवार, मोहन हाडे पाटील, श्याम राजपूत, उर्दू शिक्षक संघटनेचे शेख मोईन सय्यद वहाब उल हक, सिद्दीकी वाहिदोद्दीन, प्राथमिक मुख्याध्यापक संघटनेचे प्रकाश सोनवणे, योगेश पाटील, अभिलाष पाटील सोनवणे, शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाचे राज्य अध्यक्ष एस. डी. डोंगरे, आसाराम शेळके, भारत चाटे, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे नबी पटेल, छोटू पटेल, आवेज खान जफर पटेल, जी. एन. पाटील, प्रबळ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सुनील पांडे, कैलास गौतम, आरेफ देशमुख, राजेंद्र बाविस्कर, कल्याण मोगल, हमजा झेंडेवाला, अल्पसंख्याक संघर्ष समितीचे शेख मन्सूर, अवद चाऊस, मो. अय्युब, नवनिर्माण शिक्षक सेनेचे सुभाष मेहर, बिजू मारग, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे अजमल खान यांच्यासह विविध शिक्षक, शिक्षकेतर संघटना, संस्थाचालकांनी ‘अनुदान हक्क मोर्चा’ यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे.
शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व वीजबिल माफी करण्यात यावी, या व इतर मिळून अठरा मागण्यांसाठी गांधी पुतळा, शहागंज येथून मोर्चा काढण्यात येत आहे. पूर्वी हा मोर्चा जिल्ह्यातील प्रमुख सहा मागण्यांसाठी काढण्याचे ठरले होते; परंतु औरंगाबादला मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याने मोर्चाची व्याप्ती वाढविण्यात आली, असे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांनी सांगितले. त्यांच्या बाजूलाच आ. सुभाष झांबड बसले होते. दोन-चार दिवसांपर्यंत आ. झांबड व सत्तार यांच्यात जनविकास आंदोलन समितीवरून संघर्ष सुरू होता. मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्हाभरातून २५०० गाड्यांमधून शेतकरी व कार्यकर्ते येतील. ५० हजार शेतकरी व कार्यकर्ते सहभागी होतील. शहरातील प्रमुख मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार यांनी दिली. यावेळी डॉ. कल्याण काळे, कार्याध्यक्ष नितीन पाटील,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन यांची उपस्थिती होती.

Web Title: Various societies, teachers, hamals, Mathadi factions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.