शेती उत्तमच! टोमॅटो, कारल्याच्या उत्पादनातून वरूड काजीकरांची कोट्यवधींची कमाई
By बापू सोळुंके | Published: July 1, 2023 12:39 PM2023-07-01T12:39:53+5:302023-07-01T12:40:25+5:30
कृषी दिन विशेष : विविध राज्यांतील व्यापारी येतात, थेट बांधावरून नेतात माल; पाकिस्तानलाही शेतीमालाची निर्यात
छत्रपती संभाजीनगर : शेती परवडत नाही, कर्जबाजारी झालो म्हणून येथील एकाही शेतकऱ्याने गळ्याला फास लावून आत्महत्या केलेली नाही. एवढेच नव्हे तर उत्तम शेती आणि दुय्यम नोकरी असेच वरूड काजी येथील शेतकरी सांगतात. कारण येथील शेतकरी टोमॅटो आणि कारल्याच्या उत्पादनातून दरवर्षी कोट्यवधींचे उत्पन्न घेतात. येथील टोमॅटो आणि कारल्यांना देशासह अन्य देशांतूनही मागणी आहे.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यामुळे महाराष्ट्रात हरित क्रांती झाली. यामुळे १ जुलै रोजी त्यांची जयंती राज्यात कृषी दिन म्हणून साजरी होते. छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या पाच ते सात किलोमीटर अंतरावर वरूड काजी हे सात हजार लोकसंख्येचे गाव. येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत भाजीपाला लागवडीला प्राधान्य दिले. दरवर्षी सातशे ते हजार एकरवर शेतकरी टोमॅटोची लागवड करीत असतात. विशेष म्हणजे बाराही महिने ते टोमॅटोचे पीक घेतात. गतवर्षी आणि याही वर्षी टोमॅटोचे दर प्रचंड घसरले. यामुळेे येथील शेतकऱ्यांनी टोमॅटोसोबतच कारल्याच्या शेतीला प्राधान्य दिले. सध्या वरूडला सुमारे ४०० एकरवर टोमॅटो आणि ३०० एकरवर कारल्याची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे. येथील शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्री करण्यासाठी कोणत्याही बाजारपेठेत जावे लागत नाही तर व्यापारीच येऊन खरेदी करतात. या गावातून रोज १३ ते १५ ट्रक टोमॅटो आणि कारले विविध राज्यांत जातात.
पाकिस्तानमध्येही व्हायची टोमॅटोची निर्यात
भारत आणि पाकिस्तानची आयात, निर्यात सध्या बंद आहे. याचा फटका वरूड काजीच्या शेतकऱ्यांना बसल्याचे शेतकरी सांगतात. सरकारने निर्यातबंदी करण्यापूर्वी येथील टोमॅटोची शेतकऱ्यांनी दुबई आणि पाकिस्तानला निर्यात केली होती, असे शेतकरी सांगतात.
दर अस्थिर झाले तरी लाखोंची कमाई
आम्ही खूप कमी रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर करतो. दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थानमधील व्यापारी आमच्या बांधावर येतात. टोमॅटोचे दर अस्थिर असले तरी आम्हाला सरासरी ४० लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. तसेच कारल्यातूनही एकरी १० ते ११ लाखांचे उत्पन्न मिळू शकेल. डाळिंबातूनही मिळणारे उत्पन्न वेगळे असेल.
- संजय दांडगे, शेतकरी
टोमॅटो आणि कारल्यास प्राधान्य
ज्यांची शेती पावसावर अवलंबून आहेत तेही आणि ज्यांच्याकडे बारा महिने सिंचनाची सोय आहेत तेही शेतकरी नियमित टोमॅटो आणि कारल्याची शेती करतात. यातून लाखोंचे उत्पादन होते.
- योगेश दांडगे, शेतकरी
विदेशातही जातो माल
आमचे गाव अनेक वर्षांपासून टोमॅटो उत्पादनासाठी संपूर्ण देशभरातील व्यापाऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. आमचा माल विदेशातही जातो.
-डॉ. दिलावर बेग, सरपंच