Varun Sardesai: 'पुढचे 25 वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री', वरुण सरदेसाईंकडून आदित्य आणि उद्धव ठाकरेंवर स्तुतीसुमने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 07:43 PM2022-03-29T19:43:09+5:302022-03-29T19:43:53+5:30
Varun Sardesai: 'राज्याला आज सर्वात स्वच्छ आणि इमानदार मुख्यमंत्री लाभला. महाराष्ट्रातला युवक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या मागे उभा.'
औरंगाबाद: आज औरंगाबादमध्ये(Aurangbad) युवासेनेच्या निश्चय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातील शिवेसेनेच अनेक नेते उपस्थित होते. यावेळी वरुण सरदेसाई(Varun Sardesai) यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची तोंडभरुन कौतुक केले. तसेच, विरोधकांना शेलक्या शब्दात टोलाही लगावला.
'महाराष्ट्राला इमानदार मुख्यमंत्री लाभवा'
''आज विरोधकांना वाटते की, शिवसेनेच्या नेत्यांची मीडियामध्ये बातम्या आल्या म्हणून त्यांची बदनामी होईल. पण, मी विरोधकांना विनंती करतो की, त्यांनी आमच्यासोबत दौऱ्यावर यावे. आमच्यासोबत आल्यावर तुम्हाल लक्षात येईल, महाराष्ट्रातला युवक आज उद्धव ठाकरेंच्या मागे उभा आहे. तुम्ही कितीही बदनामी करा, त्याने काही फरक पडणार नाही. आज महाराष्ट्राला सर्वात स्वच्छ आणि इमानदार मुख्यमंत्री लाभला आहे,'' असे सरदेसाई म्हणाले.
'पुढील 25 वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री'
ते पुढे म्हणाले की, ''विरोधक शिवसेनेच्या नेत्यांबद्दल, मुख्यमंत्र्यांबद्दल वाट्टेल ते बोलत असतात. पण, गेल्या दोन वर्षात विविध चॅनेल आणि संस्थांनी सर्व्हे केले, त्यात संपूर्ण देशभरातून सलग पाचवेळा उद्धव ठाकरेंची सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. महाराष्ट्रातील जनतेने ठरवले आहे की, त्यांना पुढील 25 वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत.''
'शांत बसून चालणार नाही'
सरदेसाई यांनी यावेळी सर्व युवासैनिकांना निवडणुकीसाठी तयार राहण्यास सांगितले. ते म्हणतात, ''कोरोनामुळे मागील अनेक महिन्यांपासून औरंगाबादच्या निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहेत. आताही ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका पुढे जात आहेत. पण, आपल्याला स्वस्त बसून चालणार नाही. आपले शिवसंपर्क मोहिमेच्या माध्यमातून तयार झालेले वातावरण शांत होऊन चालणार नाही.
'आदित्य ठाकरेंचा परराष्ट्रात गौरव'
''आज राज्यासह देशातील तरुणाई मोठ्या आशेने उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंकडे बघत आहे. आदित्य ठाकरे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. एकीकडे ते राज्यभर दौरे करत आहेत, दुसरीकडे आपल्या कामाच्या माध्यमातून तरुणाईला आपल्याकडे आकर्षित करत आहेत. स्कॉटलँडमध्येचा आदित्य ठाकरेंचा गौरव करण्यात आला. त्यांचे काम पाहून, मोठा तरुणवर्ग आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेचे सदस्य होत आहेत,'' असेही ते म्हणाले.
एप्रिलमध्ये युवासेनेची नावनोंदणी
यावेळी सरदेसाई यांनी युवा सेनेच्या नाव नोंदणीबाबतही महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, ''आपण या निश्च सोहळ्याच्या निमित्ताने निश्चय केलाय. येत्या 15 एप्रिलपासून युवासेनेची 15 दिवसीय राज्यव्यापी सदस्य नोंदणी करणार आहोत. त्यात 15 लाख युवा सैनिक जोडण्याची योजना आहे. मराठवाड्यातील चार जिल्ह्यात सेनेची मोठी ताकत आहे. त्यामुळे यात या चार जिल्ह्यांचे फार महत्व असणार आहे'', असेही ते म्हणाले.