वैतरणा खोऱ्याचे पाणी गोदावरी खो-यात वळविणार -कराड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 11:51 PM2018-08-04T23:51:55+5:302018-08-04T23:51:59+5:30
वैतरणा खो-यामधून ११५ टी.एम.सी. पाणी गोदावरी खो-यामध्ये वळविण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.
औरंगाबाद : वैतरणा खो-यामधून ११५ टी.एम.सी. पाणी गोदावरी खो-यामध्ये वळविण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष उपसमितीची बैठक गुरुवारी पार पडली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला शंकरराव नागरे, ओमप्रकाश मोतीवाला, आनंतराव कराड, श्रीराम वरुडकर, बालाजी कोपलवार, ई.बी. जोगदंड, ओमप्रकाश वर्मा, जी. बी. ढाकणे, हर्षद शहा आदी तज्ज्ञ मान्यवर उपस्थित होते.
डॉ. कराड म्हणाले की, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कृष्णा खोरे प्रकल्पातील २५ टी.एम.सी. पाणी मराठवाड्याला देण्याची मागणी करण्यात आली होती. याचा देखील पाठपुरावा करणार आहे. तसेच जायकवाडीतील पाणी शेतीला देण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मराठवाड्यातील वाहतूक व दळणवळणाची परिस्थिती सुधारण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहोत. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन बळीराजा संजीवनी योजनेअंतर्गत आणखी २० प्रकल्प घेण्याची त्यांना विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मराठवाड्यातील रस्ते, नॅशनल हायवे तसेच इतर कामांच्या प्रगतीचा आढावा देखील त्यांनी यावेळी घेतला.