व्यवहारशून्यतेच्या बुजगावण्यांना सभ्यतेचे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:45 AM2017-07-30T00:45:22+5:302017-07-30T00:45:22+5:30

र्वजनिक जीवनामध्ये काम करीत असताना कसे वागायचे आणि कसे रहायचे, याबाबतची जाण नसलेल्या व्यवहारशून्य व्यक्तींची काहीशी रेलचेल वाढली असून, अशा बुजगावण्यांना सभ्यतेचे वावडे असल्याने सर्वसामान्यांना त्याचा चांगलाच त्रास सहन करावा लागत असल्याची स्थिती जिल्ह्यातील राजकीय व प्रशासकीय क्षेत्रामध्ये पहावयास मिळत आहे़

vayavahaarasauunayataecayaa-baujagaavanayaannaa-sabhayataecae-vaavadae | व्यवहारशून्यतेच्या बुजगावण्यांना सभ्यतेचे वावडे

व्यवहारशून्यतेच्या बुजगावण्यांना सभ्यतेचे वावडे

googlenewsNext

र्वजनिक जीवनामध्ये काम करीत असताना कसे वागायचे आणि कसे रहायचे, याबाबतची जाण नसलेल्या व्यवहारशून्य व्यक्तींची काहीशी रेलचेल वाढली असून, अशा बुजगावण्यांना सभ्यतेचे वावडे असल्याने सर्वसामान्यांना त्याचा चांगलाच त्रास सहन करावा लागत असल्याची स्थिती जिल्ह्यातील राजकीय व प्रशासकीय क्षेत्रामध्ये पहावयास मिळत आहे़
वयाने किंवा पदाने मोठे असलेल्या व्यक्तींचा सन्मान करावा, अशी भारतीय संस्कृती सांगते़ यासाठी कुठल्या पुस्तकी ज्ञानाची आवश्यकता नाही तर कुटूंबातील संस्कारातूनच ते मिळते़ परभणी जिल्ह्यात मात्र प्रशासकीय सेवेतील व्यक्ती असो की राजकीय क्षेत्रामध्ये वावरणारी काही नेते मंडळी असो, अशा व्यक्तींना सुसंस्कृत व सभ्यपणाचे वावडे असल्याचेच दिसून येऊ लागले आहे़ ही मंडळी आपल्यापेक्षा कितीतरी वर्षे वयाने मोठे असलेल्या व्यक्तींना एकेरी भाषा वापरत आहेत़ आपण कोणाशी बोलतोय, काय बोलतोय याचे तारतम्य नसलेल्या या व्यक्ती ‘मी’ पणाच्या आविर्भावात सभ्यतेचे सर्व संकेत पायदळी तुडवित आहेत़
पैशांच्या मागे लागलेल्या अशा व्यक्ती सकारात्मक विचार करण्याऐवजी नकारात्मक भावनेतूनच त्याकडे पाहण्यात धन्यता मानत आहेत़ डॅनियल कॅट्झ या मानसशास्त्रज्ञाने केलेल्या वर्णनानुसार मानवी वृत्ती या साधारणत: ज्ञानात्मक, वर्णनात्मक, धोरणात्मक या तीन घटकांनी बनलेल्या असतात़ पहिल्या घटकात व्यावहारिक दृष्टिकोन बाळगला जातो़ तो आर्थिक व्यवहारात योग्य असला तरी सामाजिक जीवनात मात्र हे अर्थकारण आणता कामा नये; परंतु, व्यवहारशून्य व्यक्ती मात्र सातत्याने स्वत:च्या स्वार्थाचाच विचार करून हा दृष्टिकोण बाळगतात. वर्णनात्मक घटकातील व्यक्ती या पूर्वानुभवातून विचार बनवतात़ त्यांना पूर्वीचा एखादा अनुभव आला असेल तर त्यातील चुकांचे परिमार्जन करून त्या टाळण्याचा प्रयत्न करतात़ चांगला अनुभव असेल तर आणखी त्यात सुधारणा करण्यासाठी धडपडत असतात; परंतु, व्यवहारशून्य अशा बुजगावण्यांना मात्र हा वर्णनात्मक घटक लागूच होत नाही़ भावनात्मक घटकाचा तर या बुजगावण्यांशी काहीही संबंध नाही़ कारण संवेदनशीलता हरवलेल्या या बुजगावण्यांना आपण बोललेले वाक्य एखाद्याच्या जिव्हारी लागणार आहे, याची जाणच नसते़ त्यामुळे त्यांच्यातील भावनात्मक घटकही लोप पावलेला असतो़ संत तुकाराम महाराज दांभिकांवर हल्ला चढवित असताना त्यांच्या दोह्यातून म्हणतात,
कुबेर नाव मोळी पाहे ।
कैसे वाहे फजिती।।
तुका म्हणे ठुणठुण देखे ।
उगी मूर्ख फुंदता।।
म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे नाव कुबेर असेल आणि तो मोळी वाहण्याचे काम करीत असेल तर किती मोठी ही विसंगती आहे़ याला गंमत म्हणावे, हसावे की रडावे, किती आणि कसली फजिती म्हणावी, मूर्ख लोकांनो दांभिकपणाने का बरे फुंदत आहात? नावाचा पोकळवासा किती मिरवणार आहात? संत तुकारामांचे हे प्रबोधन अशा बुजगावण्यांच्या कानावर कितीही आदळले तरी त्यांच्यामध्ये फारसा फरक पडणार नसतो़ कारण अशा व्यक्तींना पदाची नशा असते.
समोरच्या व्यक्तीला तुच्छ समजायचे, हाच विचार त्यांच्या डोक्यात सातत्याने येत असतो; परंतु, अशा व्यक्तींना त्यांच्यातील दोष दिसून येत नाही़ शिवाय त्यांच्या आवतीभोवती तसा दोष दाखविणारी मंडळीही नसते़ संत कबीर म्हणतात,
दोस पराए देखि करि,
चला हसन्त हसन्त,
अपने याद न आवई,
जिनका अदि न अंत।
याचाच अर्थ, अशा व्यक्तींना समोरच्या व्यक्तींमधील दोष पाहून हसण्यात आनंद वाटत असतो; परंतु, स्वत:मधील दोष मात्र त्यांना दिसत नाहीत़
अशा व्यक्तींना समोरच्यांना तुच्छ समजून भलेही क्षणिक आनंद मिळत असेल; परंतु, त्यांच्या उपरोक्ष मात्र समाजात त्यांची शून्य किंमत असते, याची त्यांना जाण नसते़ जरी या व्यक्ती एखाद्या मोठ्या पदावर असल्या तरी त्यांचा जनसामान्यांत फारसा प्रभाव नसतो़ शेवटी चार पुस्तके शिकून पद मिळविले म्हणजे किंवा वारसाहक्काने एखादे पद मिळाले म्हणजे सुशिक्षीत झाले यात धन्यता नसून संबंधित व्यक्ती ही सुसंस्कृत आणि जबाबदार होणे यात खरे आयुष्याचे फलित आहे़ हे समाज म्हणून आणि समाजातील जबाबदार घटक म्हणून जाणले पाहिजे़ तेव्हाच सकारात्मक घडेल, अन्यथा फुशारकी मारत आणलेल्या बडेजावपणाचा आव जनतेसमोर उघडा पडण्यास वेळ लागणार नाही़

Web Title: vayavahaarasauunayataecayaa-baujagaavanayaannaa-sabhayataecae-vaavadae

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.