विधानसभेत वंचित-मनोज जरांगे युती? प्रकाश आंबेडकर म्हणाले, "त्यांनी आता २८८ जागा...
By विजय सरवदे | Published: July 8, 2024 11:15 AM2024-07-08T11:15:33+5:302024-07-08T11:42:52+5:30
गरीब मराठ्यांना न्याय द्यायचा असेल, तर राखीव मतदारसंघ सोडून उर्वरित सर्व जागांवर गरीब मराठ्यांना उभे करावे.
छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, असा प्रस्ताव आपण ठेवला होता, पण आता विधानसभेच्या २८८ जागा लढविणार, असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे आता त्यांच्याशी युती करण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी सायंकाळी सुभेदारी विश्रामगृह येथे व्यक्त केले.
अकोला येथून मुंबईला जाण्यासाठी ते येथे आले होते. सुभेदारी विश्रामगृह येथे थोडी विश्रांती घेतली व ते विमानाने मुंबईला रवाना झाले. याप्रसंगी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधताना ते म्हणाले, आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती पुढल्या आठवड्यात ठरवू. निवडणुकीत आमचा मित्र कोण आणि दुश्मन कोण असेल, हेही ठरविले जाईल. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांनी राज्यातील राखीव मतदारसंघ सोडून उरलेल्या सर्व जागांवर गरीब मराठे उभे करावेत. लोकांच्या मनात असेल, तर मतदान करतील. आता निवडून आलेले मराठा समाजाचे ३१ खासदार हे सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांनी मनोज जरांगेंना झुलवत ठेवले आहे. गरीब मराठ्यांना न्याय द्यायचा असेल, तर राखीव मतदारसंघ सोडून उर्वरित सर्व जागांवर गरीब मराठ्यांना उभे करावे.
लाडकी बहीण या योजनेवर फार चांगल्या कॉमेंट येत आहेत. दीड हजारामध्ये गॅस स्वस्त मिळेल का, त्यातून शाळा-महाविद्यालयाची फी भरू शकतो का, आम्ही पौष्टिक आहार घेऊ शकतो का, अशा बोलक्या भावना अनेक मुलींनी व्यक्त केल्या आहेत. आमच्या आवाक्यात ज्या गोष्टी येतील, तेच जाहीर केले पाहिजे. राज्य शासनाने त्या विद्यार्थिनींच्या कॉमेंटला खरं उतरले पाहिजे. सरकारने जाहीर केलेले हे अनुदान क्षणिक असून दीड हजारात आम्ही काहीच करू शकत नाहीत, अशा मुलींच्या व्यथा आहेत.