आघाडीसाठी 'वंचित'ची दारे उघडीच; ओवेसींनी निर्णय घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 03:32 PM2020-03-03T15:32:36+5:302020-03-03T15:44:05+5:30
प्रस्ताव एमआयएमकडून आल्यास तो प्रकाश आंबेडकरांपर्यंत पोहोचवू
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत एमआयएम स्वत:हून वंचित बहुजन आघाडीपासून दूर गेली; पण अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची दारे एमआयएमसाठी उघडीच असल्याचे त्यावेळीच स्पष्ट केले होते. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता निर्णय बॅ. असदुद्दीन ओवेसी यांनी घ्यायचा आहे, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक फारुक अहमद यांनी आघाडीची इच्छा व्यक्त केली. तसा प्रस्ताव एमआयएमकडून आल्यास तो आम्ही प्रकाश आंबेडकरांपर्यंत पोहोचवू व यावर अंतिम निर्णय तेच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट के ले.
आम आदमी पार्टी वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असल्याचे सांगत फारुक कमाल दुपारी पत्रकारांना म्हणाले की, औरंगाबाद मनपा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी हा सक्षम पर्याय आहे. औरंगाबाद प्रारंभीपासूनच वंचित बहुजन आघाडीचा गड राहिलेला आहे. भारिप-बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी एकत्रित झाल्यानंतर इथे आमची मोठी ताकद आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व जागा लढवण्याचीही तयारी सुरू आहे. मतविभागणी होऊ नये म्हणून समविचारी पक्षांचा आम्हाला विचार करायचा आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधण्यासाठी फारुक अहमद, संतोष सूर्यवंशी व धम्मपाल सोनटक्के हे तीन निरीक्षक आले होते. मजनू हिलवरील मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात हा संवाद साधण्यासाठी दुपारी १ ची वेळ देण्यात आली होती. मात्र, दुपारी अडीच-तीन वाजेपर्यंत निरीक्षकच आले नव्हते. ते आले आणि त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ओबीसी नेते वंबआमधून बाहेर पडत आहेत, याकडे लक्ष वेधताच फारुक अहमद उत्तरले, एससी, एसटी व ओबीसीतील वंचित हा आमचा पाया आहे. तो मजबूतच आहे. अकोल्यात ज्यांना तीस वर्षे संधी दिली, त्यांना नवे कार्यकर्ते नकोच असतील तर ते गेल्याने पक्षावर फारसा परिणाम होणार नाही. प्रदेश महासचिव अमित भुईगळ, प्रभाकर बकले, योगेश बन, शाम भारसाकळे, रवी तायडे, अॅड. लता बामणे, वंदना नरवणे आदी यावेळी उपस्थित होते.