मराठवाड्यातील रखडलेल्या प्रकल्पांवर पंतप्रधान घेणार व्ही.सी.
By Admin | Published: September 24, 2016 12:13 AM2016-09-24T00:13:31+5:302016-09-24T00:17:25+5:30
विकास राऊत, औरंगाबाद महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना गती मिळत नसल्यामुळे केंद्र शासनाने विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली आहे.
विकास राऊत, औरंगाबाद
महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना गती मिळत नसल्यामुळे केंद्र शासनाने विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली आहे. २८ सप्टेंबर रोजी दिल्लीतून पंतप्रधान देशातील सर्व महत्त्वांच्या प्रकल्पांबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रशासनाने पंतप्रधानाच्या व्ही. सी. ची मोठी धास्ती घेतली आहे.
केंद्रीय दळणवळण खात्याचे १२ प्रकल्प राज्यात सुरू आहेत. त्या प्रकल्पांची गती मंदावली असून, त्यात मराठवाड्यातील सोलापूर-धुळे महामार्गाचा समावेश आहे. प्रकल्प रखडण्याचे नेमके कारण काय आहे. प्रशासन काय करीत आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी भूसंपादन प्रक्रिया गतिमान करण्यासाठी काय निर्णय घेत आहेत, या इतर अनेक घटकांचा पंतप्रधान आढावा घेणार असल्यामुळे राज्यातील प्रशासकीय यंत्रणेची पाचावर धारण बसली आहे.
मंगळवारी आणि बुधवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची मुंबई मुख्यालयात बैठक झाली. त्या बैठकीला राज्यातील सर्व प्रकल्प संचालकांनी हजेरी लावली. राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दिल्लीतील प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला होते. वारंवार सूचना करूनही कामांना गती मिळत नसल्यामुळे स्वत: पंतप्रधानांनी ग्राऊंड रिअॅलिटी चेक करण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी धास्ती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मराठवाड्यात राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ सोलापूर ते धुळे या महामार्गाच्या कामाला भूसंपादनामुळे अनेक ठिकाणी खीळ बसली आहे. दुसरीकडे धुळ्यापर्यंत जाणाऱ्या महामार्गाच्या निविदेचे कामही रखडले आहे. येत्या काही महिन्यांत निविदा अंतिम होण्याची शक्यता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सूत्रांनी वर्तविली. १३७२ कोटी रुपयांतून सोलापूर ते उस्मानाबाद मार्गे येडशी ते बीड ते औरंगाबाद ते धुळे, असा हा राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. तुळजापूरपर्यंत रस्त्याचे काम २५ टक्क्यांपर्यंत झाले आहे. या महामार्गातील भुयारी मार्ग आणि उड्डाणपुलांचे काम २० टक्के पूर्ण झाले आहे.