'रासेयो'चा विद्यार्थी वेदांत डिके राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित
By राम शिनगारे | Published: October 1, 2023 04:44 PM2023-10-01T16:44:47+5:302023-10-01T16:44:59+5:30
कोविड काळात उल्लेखनीय कार्य : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान
छत्रपती संभाजीनगर : विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागाचा विद्यार्थी वेदांत सुदाम डिके याला २०२१- २२ या वर्षीचा रासेयो राष्ट्रपती पुरस्काराने नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २९ सप्टेंबर रोजी सन्मानित करण्यात आले.
विवेकानंद महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसवेकांनी कोविडच्या काळात मजुरांना जेवण, मास्क, सॅनिटायझरचे वाटप, गावातील चेक पोस्टवर तापमान तपासणी, पल्सरेट रिडिंग घेण्यासह सरकारी कर्मचाऱ्यांनी गावातील कोविड लसीकरण शिबिरात मदत केली होती. त्यात वेदांत डिके याने १ हजार ६०१ नागरिकांचे लसकीरण करून घेतले होते. त्याशिवाय ८५ वृक्षारोपण, ४ युनिट रक्तदान, स्वच्छता अभियान, एड्स, मतदार, नव मतदार, बाललैगिंक छळ कायद्याविषयी जनजागृती, प्रौढ साक्षरता, रिनेबल एनर्जी अशा विविध उपक्रमांमध्ये स्वयंसेवक म्हणून डिके याने सहभाग नोंदवला होता.
त्याशिवाय आरोग्य व डोळे तपासणी, पोलिओ व लंम्पी, अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, महाविद्यालयातील दिव्यांगांना परीक्षेत मदत, तसेच गाव, वाड्यांवरील गरजूंना उज्वला योजना , जनधन योजना, जीवन विमा योजना अशा केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला. या सामाजिक कार्याला रोसेयोचा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाट, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, प्राचार्य डॉ.डी.आर. शेंगुळे, रासेयोचे माजी संचालक डॉ. टी.आर. पाटील, डॉ.आनंद देशमुख, संचालक डॉ. सोनाली क्षीरसागर यांनी वेदांतचे अभिनंदन केले आहे.