भाजीपाला मातीमोल
By Admin | Published: January 20, 2017 12:12 AM2017-01-20T00:12:05+5:302017-01-20T00:12:42+5:30
बीड येथील बाजारपेठेत गेल्या १५ दिवसांपासून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने दर गडगडले आहेत.
राजेश खराडे बीड
येथील बाजारपेठेत गेल्या १५ दिवसांपासून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने दर गडगडले आहेत. आडतीवर किलोवर होणारी विक्री व्यापाऱ्यांकडून कॅरेटवर केली जात आहे. सर्रास पालेभाज्यांची विक्री २ ते ३ रुपये प्रतिकिलोप्रमाणे होत आहे. रात्री उशिरापर्यंत विक्री न झाल्यास बसल्या ठिकाणीच शेतकरी भाजीपाला सोडून मार्गस्थ होत आहेत.
मुबलक प्रमाणात पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीवर भर दिला होता. साधारणत: जून-जुलैमध्ये कांदा, बटाटा, टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती. गत आठवड्यापर्यंत मेथी, पालक, चुका, हरभरा यांची विक्री १० रुपयांत ५ जुड्या याप्रमाणे होत होती, तर बटाटा, टोमॅटोला २० रुपये किलोचा दर असल्याने किमान रोजगार तरी उपलब्ध होत होता; मात्र या आठवड्याच्या सुरुवातीपासून ग्रामीण भागासह इतर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर आवक होऊ लागली आहे. परिणामी सर्वच भाज्यांचे दर घसरले आहेत.
गेल्या तीन वर्षांत दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यावेळी मात्र दर आकाशाला भिडले होते. सध्या अधिकचे उत्पादन झाल्यामुळे दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांची दोन्हीकडून कोंडी होत आहे. बीड येथील खासबाग देवीच्या पाठीमागे भरल्या जाणाऱ्या बाजारात अहमदनगर, कर्जत, आष्टी, जामखेड, सोलापूर, उस्मानाबाद या ठिकाणांहून आवक होत आहे.
५० रुपये कॅरेटप्रमाणे कोबी, टोमॅटो, बटाट्यांची खरेदी करून विक्रेते तोच माल भाजीमंडईत ३ ते ४ रुपये किलोने विकत आहे. एका कॅरेटमध्ये जवळपास २० किलो एवढ्या भाज्या मावतात. भाजी मंडईत अशी अवस्था असूनदेखील ग्राहकांकडून यापेक्षाही कमी दरात भाज्यांची मागणी होत आहे. त्यामुळे हताश होऊन विक्रेते आहे तसाच ठेवून मार्गस्थ होणे पसंत करीत आहेत.