कृउबातील भाजी विक्रेत्यांना रस्त्यावरून हटविले
By | Published: December 4, 2020 04:00 AM2020-12-04T04:00:18+5:302020-12-04T04:00:18+5:30
औरंगाबाद : भाजीपाला विक्री व खरेदीसाठी जाधववाडीत आडत बाजारात होणारी प्रचंड गर्दी आटोक्यात आणण्यासाठी बाजार समितीने अंतर्गत मुख्य रस्त्यावरील ...
औरंगाबाद : भाजीपाला विक्री व खरेदीसाठी जाधववाडीत आडत बाजारात होणारी प्रचंड गर्दी आटोक्यात आणण्यासाठी बाजार समितीने अंतर्गत मुख्य रस्त्यावरील किरकोळ विक्रेत्यांना हटविले व त्यांची व्यवस्था बाजार संकुलात केली. यामुळे बुधवारी येथील रस्ते मोकळे दिसत होते.
भाज्यांची आवक वाढल्याने स्वस्त भाज्या खरेदीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किरकोळ विक्रेते व ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे. हिच गर्दी शहरात कोरोनाची दुसरी लाट येण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. यासंदर्भातील बातमी सोमवारी लोकमतमध्ये प्रकाशित झाली होती. यामुळे खडबडून जागे झालेल्या बाजार समितीने गर्दी आटोक्यात आणण्यासाठी नियोजन केले. त्यानुसार अंमलबजावणी करण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. कृउबात येणारे शेतकरी, किरकोळ विक्रेते यांना आडत बाजारातील रस्त्यावर बसण्यास मज्जाव करण्यात आला. त्या ऐवजी त्यांना तेथील मोठ्या शेडमध्ये ओट्यावर बसविण्यात आले. उर्वरित विक्रेते व हातगाडीवाल्यांना आडत बाजारा मागील रिकाम्या रस्त्यावर एकाबाजूने विक्री करण्यास परवानगी दिली. एवढेच नव्हे तर मोकळ्या जागेवर वाहने पार्किंग करण्याची व्यवस्था करण्यात आली. यामुळे ग्राहकांची विभागणी झाली. आडत बाजारातील रस्ते मोकळे झाले होते.
लॉकडाऊनच्या काळात अशीच गर्दी होत असल्याने मनपाने येथील किरकोळ विक्रेत्यांना शहरातील विविध मैदानावर भाजीपाला विक्रीची व्यवस्था केली होती. पण स्थानिकांच्या विरोधामुळे मनपाचे नियोजन बारगळले होते. पुन्हा किरकोळ विक्रेते जाधववाडीत कृषी उत्पन्न बाजार समितीत येऊन बसले.
चौकट
अंमलबजावणीवर यश अवलंबून
मंगळवारी मध्यरात्री ते बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत बाजार समिती कर्मचाऱ्यांनी पहारा देऊन विक्रेते, ग्राहक, पार्किंगचे नियोजन केले. त्याचा चांगला परिणाम लगेच दिसून आला. आता बाजार समिती किती दिवस अंमलबजावणी करते व विक्रेते व ग्राहकांना शिस्त लागते का यावर गर्दी आटोक्यात राहील की नाही ते अवलंबून राहील, असे आडत व्यापाऱ्यांनी सांगितले.