काय खाताय, बघा नीट! शहागंज भाजी मंडईत उकिरड्यावर विकला जातोय भाजीपाला
By प्रशांत तेलवाडकर | Published: May 23, 2024 04:33 PM2024-05-23T16:33:07+5:302024-05-23T16:34:32+5:30
तुम्ही उकिरड्यावरच्या भाज्या खाता का ? मग नक्कीच आजारी पडाल
छत्रपती संभाजीनगर : तुम्ही उकिरड्यावरची भाजी खाता का? असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्हाला धक्काच बसेल. अहो, शहागंज भाजी मंडईत उकिरड्यावर भाजीपाला विकला जातोय. सडलेले फळ भाजीपाला व हॉटेलमधील कुजलेले अन्नपदार्थ आणून टाकले जाते व त्याच्या बाजूला भाजीपाला विकला जात आहेत. भाज्यांवरून हात फिरविला की, हजारो माश्या घोंगावत उडतात. अशी अवस्था असूनही ग्राहक येथून भाजीपाला खरेदी करतात हेही विशेष.
शहागंजमध्ये पूर्वी भाजीपाल्याचा अडत बाजार भरविल्या जात होता. १९९७ मध्ये येथील अडत बाजार जाधववाडी मार्केट यार्डमध्ये स्थानांतरित करण्यात आला आणि तेथील गाळ पाडण्यात आली. त्याच वेळी मॉडर्न मार्केटच्या नावाखाली महानगरपालिकेने भाजी मंडई उद्ध्वस्त केली. येथे २०१२ पासून होलसेल मार्केटच्या ढिगाऱ्यावर भाजी मंडई भरत आहे. जिथे जागा मिळेल तिथे बस्तान मांडून विक्रेते भाज्या विकत आहेत. जागा नसल्याने अखेर अनेक विक्रेते उकिरड्यालगतच भाज्या विकत आहेत.
या उकिरड्यावर मनपातर्फे दररोज ओला व सुका कचरा साफ केला जातो, पण सडलेल्या पालेभाज्या फेकून दिला जातो. आसपासचे हॉटेलवाले कुजलेले अन्नपदार्थ येथेच आणून टाकतात. यामुळे दिवसभर येथे चिलटे, माश्यांचा प्रादुर्भाव असतो. त्याच माश्या मग आसपासच्या हातगाड्यांवरील भाज्यांवर जाऊन बसतात. हातगाडीवरील भाज्यांवर नुसता वरून हात फिरविला की, हजारो चिल्टे, माश्या उडतात एवढी घाण परिस्थिती तेथे आहे. उकिरड्यावर दुर्गंधीही असतेच, ग्राहक नाकाला रुमाल बांधून येथे पालेभाज्या खरेदी करताना दिसून आले.
स्वस्त टोमॅटोमुळे दुर्गंधीकडे दुर्लक्ष
भाजी मंडई परिसरात गावरान टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. या टोमॅटोवरही माश्या घोंगावत होत्या, पण १० रुपये किलोने टोमॅटो तेही गावरान मिळत असल्याने ग्राहक दुर्गंधी सहन करीत टोमॉंटो खरेदी करीत होते.
आम्ही माणसं आहोत याचा मनपाला विसर
मागील १५ वर्षांपासून मी येथे भाजी विकते. जागा मिळत नसल्याने उकिरड्याच्या बाजूला बसून भाज्या विकते. पोटासाठी उकिरड्यावर दुर्गंधी सहन करत बसावेच लागते. पण, आम्ही माणसं आहोत याचा मनपाला विसर पडला आहे. यामुळेच कचरा वेळेवरच उचलला जात नाही.
-करिमा पठाण, ज्येष्ठ भाजी विक्रेत्या
हॉटेलवाल्यांचे कुजलेले अन्नपदार्थ उकिरड्यावर
मनपाचे सफाई कर्मचारी सकाळी येऊन कचरा साफ करून जातात. पण, सकाळी १० वाजेनंतर आसपासचे हॉटेलवाले त्यांच्याकडील कुजलेले अन्नपदार्थ येथे उकिरड्यावर आणून टाकतात. भाजीपालावाले त्यांच्यकडील खराब झालेले कांदे, बटाटे आदी फळभाज्या येथेच फेकून दिले जातात.
- सलीम बागवान
अन्नपदार्थ, कॅरिबॅग जनावरांच्या पोटात
शहागंज भाजी मंडईतील उकिरड्यावर मोठ्या प्रमाणात जनावरांचा वावर असतो. त्यात गायीची संख्या अधिक असते. कॅरिबॅगसह कुजलेले अन्नपदार्थ त्या खाऊन टाकतात.