वाहनाला डिझेल, पेट्रोलनुसार रंगीबेरंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:02 AM2021-08-01T04:02:07+5:302021-08-01T04:02:07+5:30
स्टिकर लावायचे म्हणजे काय हो दादा? औरंगाबादकरांना सध्या तरी कटकट नाही : प्रादेशिक परिवहन विभाग म्हणते असे काही आलेच ...
स्टिकर लावायचे म्हणजे काय हो दादा?
औरंगाबादकरांना सध्या तरी कटकट नाही : प्रादेशिक परिवहन विभाग म्हणते असे काही आलेच नाही
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या निकषानुसार इंधनाप्रमाणे वाहनांना विशिष्ट रंगाचे स्टिकर लावावे लागणार आहे. त्यामुळे वाहनाला डिझेल, पेट्रोलनुसार रंगीबेरंगी स्टिकर लावायचे म्हणजे काय हो दादा, असा सवाल उपस्थित करण्याची वेळ वाहनचालकांवर येत आहे. मात्र, प्रादेशिक परिवहन विभागाला यासंदर्भात अद्याप काहीही माहिती प्राप्त झालेली नाही. त्यामुळे सध्यातरी स्टिकर लावण्याच्या कटकटीपासून औरंगाबादेतील वाहनचालकांची सुटकाच आहे, असे म्हणावे लागेल.
नव्या वाहनांना हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बंधनकारक करण्यात आली. त्याबरोबरच वाहनांची दुरूनच ओळख व्हावी आणि प्रदूषण करणारी वाहने कोणती, याची ओळख होण्यासाठी वाहनांना इंधनानुसार स्टिकर लावण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु केंद्राचा हा निर्णय परिवहन विभागापर्यंत पोहोचलेलाच नाही. त्यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना यासंदर्भात कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. त्या उलट सामान्य वाहनचालकांपर्यंत सामाजिक माध्यमातून स्टिकर लावण्याचे मेसेज पोहोचत आहेत. त्यामुळे या स्टिकरविषयी विचारणा करण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. आजघडीला पांढरी, पिवळी आणि इलेक्ट्रिक वाहनांमुळे हिरवी नंबर प्लेट शहरात पाहायला मिळत आहे. मात्र, इंधनाच्या रंगानुसार स्टिकर लावलेले वाहन सहजासहजी पाहायला मिळत नाही. या स्टिकरमुळे काय साध्य होणार, हा बदल का करण्यात आला, असे प्रश्नही उपस्थित केो जात आहेत.
--------
स्टिकर कुठे मिळणार?
सामाजिक माध्यमांवरील मेसेज वाचून अनेक चारचाकी वाहनचालक आरटीओ कार्यालय परिसरात या स्टिकरची विचारणा करीत आहेत; परंतु परिसरातील कोणालाच स्टिकरविषयी काहीही सांगता येत नाही.
-------
कारवाईचा विषयच नाही
स्टिकर नाही लावले तर कारवाई होईल, असा अनेकांचा समज झाला आहे; परंतु जी गोष्टी आरटीओ अधिकाऱ्यांनाच माहिती नाही तर त्याविषयी कारवाई होण्याचा प्रश्नच नाही. याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतरच कारवाईविषयी स्पष्ट होऊ शकते.
जिल्ह्यातील एकूण वाहने
दुचाकी वाहने - १२,०२,९२७
चारचाकी वाहने -१,२९, ८२१
इलेक्ट्रिक वाहने-१,१३३
ट्रक-१७,०३२
ऑटोरिक्षा - ३५,९६८
ट्रॅक्टर-३६,०२४
-----
कोणत्या गाड्यांसाठी कुठल्या रंगाचे स्टिकर ?
पेट्रोल व सीएनजी- फिकट निळा
डिझेल वाहने- नारंगी
इलेक्ट्रिक व हायब्रिड वाहने-हिरवा
---
वेगवेगळ्या नंबर प्लेट
इंधनानुसार वेगवेगळे स्टिकर लावायचे, असा काही निर्णय अद्याप तरी आलेला नाही. एलपीजी, सीएनजी, इलेक्ट्रिक अशा वाहनांसाठी वेगवेगळ्या रंगांच्या नंबर प्लेट आहेत. त्यामुळे स्टिकरची सध्या तरी गरज नाही.
- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी