जिल्ह्यात वाहन वितरणाची गती मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:04 AM2021-05-31T04:04:41+5:302021-05-31T04:04:41+5:30

औरंगाबाद : कोरोनाला रोखण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. याचा जसा सर्व व्यवसाय व उद्योगावर परिणाम झाला आहे, ...

Vehicle distribution in the district slowed down | जिल्ह्यात वाहन वितरणाची गती मंदावली

जिल्ह्यात वाहन वितरणाची गती मंदावली

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोनाला रोखण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. याचा जसा सर्व व्यवसाय व उद्योगावर परिणाम झाला आहे, तेवढाच गंभीर परिणाम वाहन उद्योगावर झाला आहे. कंपन्यांत उत्पादन सुरू आहे; पण वाहने विक्री होत नाहीत. अशीच परिस्थिती राहिली तर कंपन्या आपले उत्पादन कमी करतील. अंतिमतः याचा फटका अर्थव्यवस्थेला बसेल.

जिल्ह्यात वाहन वितरकांची ६० शोरूम्स आहेत. महाराष्ट्रात औरंगाबाद जिल्हा वाहन यात दुचाकी, चारचाकी, व्यावसायिक वाहन विक्रीत आघाडीवर आहे. मात्र, दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे शोरूम बंद आहेत. परिणामी वाहन उद्योगाची आर्थिक गती थांबली आहे. याचा फटका ६० वाहन वितरक, त्यांच्यावर अवलंबून सुमारे ६५०० कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाला बसला आहे.

एवढेच नव्हे, तर राज्य सरकारचा व केंद्र सरकारच्या महसूल वसुलीत मोठी घट झाली आहे. संपूर्ण अर्थचक्राला हा धक्का आहे. त्यात आता चेन्नई येथे ७ जूनपर्यंत लॉकडाऊन आहे. कार उत्पादनातील काही कंपन्यांचे उत्पादन तिथे होते ते बंद झाले आहे. याचाही परिणाम देशभरात जाणवत आहे. शोरूम सुरू झाले तर थांबलेले अर्थचक्र सुरू होईल. गणेशोत्सवापासून गती येईल; पण त्यासाठी १ जूनपासून शोरूम सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी माहिती वाहन वितरकांनी दिली.

चौकट

१२ हजार दुचाकी, १८०० कारची विक्री थांबली

एप्रिल व मे या महिन्यांत जिल्ह्यात १२ हजार दुचाकी व १८०० कारची विक्री होत असते; पण लॉकडाऊनचा मोठा आर्थिक फटका वाहन उद्योगाला बसला आहे. जिल्ह्यात ६० शोरूम आहेत. त्यात ६५०० कर्मचारी आहेत. या सर्वांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. लॉकडाऊन आणखी लांबला तर उत्पादन कंपन्याही बंद पडू शकतात. याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.

राहुल पगारिया, संचालक पगारिया ऑटो

---

कोरोना रुग्णसंख्या कमी झाली

कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. यामुळे आता शोरूम उघडण्यास परवानगी द्यावी. तसेही कार खरेदीसाठी शोरूममध्ये दिवसभरात ८ ते १० ग्राहक येतात. सुरक्षेची संपूर्ण काळजी घेत शोरूम सुरू ठेवता आली असती. जर शोरूम उघडे असते तर अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला नसता.

मनीष धूत

संचालक, धूत मोटर्स

---

सामाजिक प्रश्न निर्माण होतील

मागील दोन महिन्यांपासून लोक व्यवसाय बंद करून घरी बसले आहेत. त्यामुळे आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता लॉकडाऊन वाढले तर सामाजिक प्रश्न निर्माण होतील. सामाजिक आरोग्य बिघडू नये, यासाठी व्यवसाय सुरू करण्यास सरकारने परवानगी द्यावी.

राहुल मिश्रीकोटकर, संचालक, अरिहंत होंडा

--

कोट्यवधीचा सरकारी महसूल बुडाला

ऑटोमोबाईल उद्योगात सर्वाधिक रोजगार देणारा उद्योग आहे. एकूण जीएसटीच्या ५० टक्के जीएसटी याच उद्योगातून दिला जातो. आरटीओची ऑनलाईन रजिस्ट्री महिनाभर बंद होती. याचाही परिणाम दिसून आला. वर्कशॉपवरही लॉकडाऊनचा परिणाम झाला. वाहन जीवनावश्यक वस्तू बनली आहे. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी स्वतःचे वाहन असणे यास प्राधान्य दिले जात आहे.

संदेश झांबड

अध्यक्ष, चेंबर ऑफ अर्थोराईज डीलर्स असोसिएशन

Web Title: Vehicle distribution in the district slowed down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.