वाहन परवान्याची शुल्क वाढ पाच पट
By Admin | Published: January 7, 2017 11:06 PM2017-01-07T23:06:03+5:302017-01-07T23:08:35+5:30
लातूर : वाहन परवाना, कर्ज बोजा चढविणे, नवीन वाहनांची नोंदणी आदी २८ प्रकारच्या शुल्कात केंद्र शासनाने दहा पटीहून अधिक वाढ केली आहे़
लातूर : वाहन परवाना, कर्ज बोजा चढविणे, नवीन वाहनांची नोंदणी आदी २८ प्रकारच्या शुल्कात केंद्र शासनाने दहा पटीहून अधिक वाढ केली आहे़ नव्या वर्षात वाहनधारकांना वाढीव भुर्दंड सहन करावा लागला आहे़ केंद्र शासनाने दरवाढीचे आदेश २९ डिसेंबर २०१६ रोजी काढले असून आदेश काढल्यापासून याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत़
आरटीओ कार्यालयांना शुल्कवाढ करण्यात आल्याचे आदेश उशिरा मिळाल्याने दरम्यानच्या काळात जुन्या दरात झालेली कामे संबंधितांकडून उर्वरित शुल्क वसूल करून करावीत, असे निर्देश राज्याच्या परिवहन आयुक्तांनी दिले आहेत़
जुन्या दरानुसार सर्व प्रकारच्या वाहनांचे लर्निंग लायसन काढण्यासाठी ३० रूपये घेतले जात होते़ नवीन नियमानुसार आता १५० रूपये द्यावे लागणार आहेत़ तसेच फेर परीक्षेसाठी पूर्वी शुल्क नव्हते़ आता मात्र ५० रूपये शुल्क द्यावे लागणार आहे़ पक्क्या लायसन्ससाठी फेरचाचणी देताना ५० ऐवजी ३०० रूपये मोजावे लागणार आहेत़ लायसन्सची वैधता संपल्यावर नूतनीकरण करताना उशीर झाल्यास प्रतिवर्ष ५० रूपये दंड आकारला जात होता़ त्या दंडाची रक्कम आता एक हजार रूपये करण्यात आली आहे़ वाहनांवर कर्जाचा बोजा चढविण्यासाठी वाहन प्रकारानुसार १०० रूपयावरून ५०० ते ३ हजार रूपये करण्यात आली आहे़ तो बोजा उतरवून नवीन नोंदणी पुस्तकासाठी आता वेगळे शुल्क द्यावे लागणार आहे़