वाहन बाजार, घर खरेदी जोमात; दसऱ्याला शहरात ५०० कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 03:27 PM2020-10-26T15:27:20+5:302020-10-26T15:28:16+5:30
सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक्स बाजारात गतवर्षीच्या तुलनेत मंदी
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : दसऱ्याचा मुहूर्त साधत औरंगाबादकरांनी दणदणीत नवीन खरेदी केली. बाजारात ५०० कोटींची उलाढाल झाली. यात वाहन व बांधकाम व्यवसाय नंबर वन राहिले.
बाजारात वर्षभर नवीन उत्पादने विकली जातात, तरी मुहूर्तावरील खरेदी शुभ मानणारा मोठा ग्राहक वर्ग आहे. रविवारी सकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने व्यापारी वर्गाची काळजी वाढविली होती; पण ही काळजी लगेच दूर झाली. दुपारनंतर ऊन पडले. दिवसभरात सुमारे ३ हजार मोबाईल हँडसेट विक्री झाले. यात ८ हजार ते ५० हजार रुपयांच्या हँडसेटचा समावेश आहे. सुमारे २ कोटींची उलाढाल झल्याची माहिती ज्ञानेश्वर खेर्डे यांनी दिली. मागील नऊ दिवस कपडे खरेदीसाठी बाजारात गर्दी होती. शहरात सर्व व्यापारी क्षेत्र मिळून दिवसभरात ५०० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज प्रफुल मालानी यांनी वर्तविला.
110 कोटींची वाहन बाजारात उलाढाल
वाहनाच्या शोरूममध्ये ग्राहकांची वर्दळ होती. कार खरेदीसाठी सहपरिवार ग्राहक येत होते. असेच चित्र दुचाकीच्या शोरूममध्ये दिसले. मागील दोन दिवसांत शहरात ४५० कार तर २ हजार दुचाकी विक्री झाल्या. वाहन बाजारात सुमारे ११० कोटींची उलाढाल झाल्याची माहिती चेंबर ऑफ ऑथोराईज ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल पगारिया यांनी दिली.
04 ते 05 कोटींची सराफा बाजारात उलाढाल
कोरोना काळानंतर रविवारी सराफा बाजारात तुरळक गर्दी दिसली. गेले सहा महिने सोन्याचे वाढलेले भाव पाहता सराफा बाजारात ग्राहकीवर मोठा परिणाम झालेला दिसला. रविवारी सोने ५२८०० रुपये प्रति १० ग्रॅम होते. दिवसभरात ४ ते ५ कोटींची उलाढाल झाल्याची माहिती सराफा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दिली. एकूणच बाजारात काहीसे नैराश्य होते.
25 ते 30 कोटींचे इलेक्ट्रॉनिक्स
इलेक्ट्रॉनिक्समध्ये टीव्ही, फ्रीज, वाॅशिंग मशीनची विक्री मागील वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी कमी राहिली; पण कोरोनाकाळ लक्षात घेता ग्राहकांचा अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद राहिला. इलेक्ट्रॉनिक्स बाजारात दिवसभरात २५ ते ३० कोटींदरम्यान उलाढाल राहिली, अशी माहिती टीव्ही डीलर्स संघटनेचे अरुण जाधव यांनी दिली.
१५० फ्लॅट, रोहाऊसची विक्री
नव्या घरांचाही अनेकांनी घेतला ताबा गृहकर्जावरील कमी झालेले व्याजदर, मुद्रांक शुल्कात ३ टक्के सूट याचा फायदा घेण्यासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर १५० फ्लॅट्स, रोहाऊस बुक झाले. तेवढेच लोक नवीन घरात राहायला गेले. १५० कोटींची उलाढाल या व्यवसायात झाली. बुकिंगमधून १५ कोटी रुपये आले, अशी माहिती क्रेडाईचे उपाध्यक्ष नितीन बागडिया यांनी दिली.