'स्पीड गन'मुळे वाहनधारक सोसताहेत भुर्दंड; नियमांतील विसंगतीने रोज होतोय खिसा रिकामा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 06:30 PM2021-11-17T18:30:05+5:302021-11-17T18:31:30+5:30
वेग मर्यादेचे उल्लंघनाच्या नियम आणि वाहनांमधील गतीची मर्यादा वेगवेगळी, सुधारणेची आवश्यकता
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्येक रस्त्यावर वेगवेगळी मर्यादा आणि त्याविषयी वाहनचालकांना सहज माहितीदेखील मिळत नाही. त्यामुळे रस्त्यावर वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यावरून वाहनचालकांचा रोज खिसा रिकामा होत आहे. ९० किमीपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविता येत नसेल तर नव्या वाहनांना वेगमर्यादा का घातली जात नाही, असा संतप्त सवाल वाहनचालक विचारत आहेत.
औरंगाबाद ते सोलापूर आता काही तासांत, औरंगाबाद ते नागपूर प्रवासाचा वेळ होणार कमी, असा गाजावाजा करत रस्ता तयार करण्यात येतो. नव्या चारचाकी दाखल करताना वाहनांच्या गतीचा आवर्जून उल्लेख केला जातो. प्रत्यक्षात वाहनाची गती अधिक असल्याच्या कारणावरून महामार्ग पोलिसांकडून कारवाई करण्यात येते.
९० चे ९१ झाले, तरी कारवाई
औरंगाबाद जिल्ह्यात दोन स्पीड गन वाहनांच्या मदतीने महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येते. मर्यादेपेक्षा एक किमी म्हणजे अगदी ९० चे ९१ किमी प्रतितास वेग वाढला, तरी एक हजार रुपयांचा दंड लावण्यात येतो.
फलक नाही, उतारावर का कारवाई ?
ऐन उताराच्या रस्त्यावर आणि घाटात वाहनांच्या गतीची मोजणी करून कारवाई केली जाते. रस्त्यावर जागोजागी वेग मर्यादेसंदर्भात फलक लावण्याची गरज आहे. परंतु, ठराविक ठिकाणीच ते फलक दिसतात. मांजरसुंबा घाटात अपघातांचे प्रमाण अधिक असल्याने मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले.
वेगमर्यादा वाढवा, नाही तर वाहनांत बदल करा
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर समतल भाग, घाट भाग, द्रुतगती मार्ग, मनपा क्षेत्र यानुसार ३० किमीपासून तर १०० किमी प्रतितास अशी वेगमर्यादा आहे. काही रस्त्यांची स्थिती सुधारली आहे. त्यामुळे योग्य अभ्यास करून वेगमर्यादा वाढीची गरज आहे. नाही तर वाहनांचा वेगच वाढणार नाही, अशा प्रकारे वाहनांत बदल करण्याची अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.
ऑक्टोबरमध्ये ६,९०६ वाहनचालकांवर कारवाई
ऑक्टोबर महिन्यात वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६९०६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांना एकूण ६९ लाख ६ हजारांचा दंड लावण्यात आला. यात केवळ ८० वाहनचालकांनी दंड भरला.
काही रस्त्यावरील वेगमर्यादा
- सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्ग- ९० किमी प्रतितास
- औरंगाबाद - पुणे मार्ग -६० किमी प्रतितास
वेगमर्यादेचे पालन आवश्यक
अपघात झाला तर वाहनचालकाचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. स्पीड गनद्वारे वेगमर्यादेची कारवाई होते. त्यात मानवी हस्तक्षेप होत नाही.
- डाॅ. दिलीप टिपरसे, पोलीस उपअधीक्षक,महामार्ग सुरक्षा पोलीस