प्रेयसीला भेटण्यासाठी शहरात आलेला अट्टल वाहनचोर पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 07:46 PM2019-07-16T19:46:47+5:302019-07-16T19:49:15+5:30
आरोपीविरोधात विविध राज्यांत वाहनचोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.
औरंगाबाद : प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या अट्टल वाहनचोराला साथीदारासह पुंडलिकनगर पोलिसांनी सोमवारी पकडले. तो निगडी पोलिसांसह एमआयडीसी वाळूज पोलिसांना वाहनचोरीच्या गुन्ह्यात हवा आहे. आरोपीविरोधात विविध राज्यांत वाहनचोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.
गुरुसेवकसिंग ऊर्फ आमन लेटभिंदरपाल सिंग (३०, रा. गुरुनानक गल्ली, पटियाला, ह.मु. लुधियाना, पंजाब) असे आरोपीचे नाव आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, शहरातील एक तरुणी फिरण्यासाठी पंजाबमध्ये गेली होती. त्यावेळी तिची ओळख गुरुसेवकसिंग ऊर्फ अमनसोबत झाली होती. तेव्हा त्याने तो अभियंता असल्याचे तिला सांगितले होते. त्यांनी परस्परांना त्यांचे मोबाईल नंबर दिले. गेल्या वर्षभरापासून अमन आणि ती तरुणी मोबाईलवरून संपर्कात होते. मात्र, प्रत्यक्षात आरोपी महागड्या कार चोरी करून तो त्यांची विक्री करणारा अट्टल वाहनचोर आहे. वाहनांचे लॉक उघडण्याकरिता त्याच्याकडे चायना मेड स्कॅनर आहे. या स्कॅनरच्या साहाय्याने तो कोणतीही कार सहज उघडतो आणि अवघ्या काही मिनिटांत चोरून नेतो. दरम्यान, गुरुसेवकसिंग ऊर्फ अमन हा प्रेयसीला भेटण्यासाठी शहरातील शिवाजीनगर येथे आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना मिळाली. यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सोनवणे आणि कर्मचाऱ्यांनी अमनला त्याचा साथीदारासह पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याची चौकशी करताच तो मी नव्हेच अशा पद्धतीने तो उत्तरे देत होता. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखविताच तो अट्टल वाहनचोर असल्याची कबुली त्याने दिली. काही दिवसांपूर्वी त्याने पिंपरी चिंचवडमधील निगडी येथून कार चोरून नेली होती. यामुळे निगडी पोलिसांना तो हवा आहे. शिवाय वाळूज एमआयडीसीमधून त्याचा साथीदार शेख बाबू याने कार चोरली आहे. आरोपी गुरुसेवकसिंग ऊर्फ अमन आणि त्याच्या साथीदाराला एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती सपोनि. सोनवणे यांनी दिली.