पोलीस ठाण्यांसमोर ‘नो पार्किंग’मध्येच उभी केली जातात वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:04 AM2021-06-30T04:04:22+5:302021-06-30T04:04:22+5:30
रिॲलिटी चेक बापू सोळुंके औरंगाबाद : शहरातील विविध पोलीस ठाण्यांसमोर ‘नो पार्किंग’च्या फलकासमोरच पोलीस आणि तक्रारदारांची वाहने उभी केली ...
रिॲलिटी चेक
बापू सोळुंके
औरंगाबाद : शहरातील विविध पोलीस ठाण्यांसमोर ‘नो पार्किंग’च्या फलकासमोरच पोलीस आणि तक्रारदारांची वाहने उभी केली जात असल्याचे लोकमतने मंगळवारी केलेल्या रिॲलिटी चेकमधून समोर आले. ‘नो पार्किंग’मध्ये वाहने उभी करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून सतत कारवाई होते. मात्र, पोलीस ठाण्यांसमोर ‘नो पार्किंग’च्या फलकासमोर रात्रंदिवस उभ्या राहणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखेचे पोलीस कारवाई करणार का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत १७ पोलीस ठाणे कार्यरत आहेत. यापैकी सिटी चौक, क्रांती चौक, सिडको, जिन्सी, छावणी, एमआयडीसी सिडको ठाणे, वेदांतनगर आणि मुकुंदवाडी हे पोलीस ठाणे सरकारी इमारतीत आहेत. बेगमपुरा, पुंडलिकनगर, जवाहरनगर, सातारा आणि दौलताबाद हे पोलीस ठाणे किरायाच्या जागेत सुरू आहेत. सिटी चौक हे सर्वात जुने पोलीस ठाणे आहे. या ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी ठाण्यामागील मोकळ्या जागेत वाहनतळ आहे. असे असताना सिटी चौक पोलीस ठाण्यासमोर पाेलीस कर्मचारी आणि तक्रारदारांची वाहने उभी असल्याचे लोकमतने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये समोर आले. जवाहरनगर पोलीस ठाण्याला दुचाकींचा कायम वेढा असतो. किरायाच्या इमारतीत असलेल्या या ठाण्याला वाहन पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नाही. परिणामी ठाण्यासमोर रस्त्यालगत नागरिक आणि पोलीस त्यांची वाहने उभी करतात. तेथे उभी केली जाणाऱ्या वाहनांमुळे अधिकाऱ्यांना त्यांची वाहने कुठे उभी करावे, असा प्रश्न पडतो. निदान ठाण्याच्या दारासमोर तरी वाहने उभी करू नये, याकरिता तेथे ‘नो पार्किंग’चे दोन फलक लावण्यात आले आहेत. या फलकाकडे दुर्लक्ष करून सर्रास वाहने उभी केली जात असल्याचे दिसून आले. उस्मानपुरा पोलीस ठाण्याचीही अशीच अवस्था आहे. महापालिकेच्या इमारतीत हे ठाणे कार्यरत आहे. ठाण्याच्या समोर आणि आवारात जप्त वाहने उभी केली आहेत. तेथे स्वतंत्र वाहनतळ नसल्याने तक्रारदार आणि पोलीस अधिकारी, कर्मचारी ठाण्याच्या आवारात त्यांची वाहने उभी करीत असल्याचे रिॲलिटी चेकमध्ये स्पष्ट झाले.
-------------------------
चौकट
शहरातील पाच ठाण्यांना वाहनतळच नाही
पुंडलिकनगर ठाणे
सिडको एन-४ येथील एका बंगल्यात कार्यरत आहे. या ठाण्यात तक्रार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने ठाण्यासमोरील गल्लीत अथवा शेजारील रस्त्यावर उभी केली जाते.
जवाहरनगर ठाणे
या ठाण्याचे स्वतंत्र वाहनतळ नसल्याने पोलीस आणि तक्रारदारांची वाहने ठाण्यासमोर आणि शेजारील हॉटेल, दुकानासमोर उभी केली जातात.
सिटी चौक ठाणे
या ठाण्याला वाहनतळ आहे. मात्र वाहनतळांवर वाहने उभी करण्यास पुरेशी जागा नसल्याने पोलीस आणि नागरिक ठाण्यासमोर वाहने उभी असतात.
उस्मानपुरा ठाणे
उस्मानपुरा ठाण्यासमोर रस्त्यावर वाहने उभी केली जातात.
बेगमपुरा ठाणे
किरायाच्या जागेत सुरू असलेल्या बेगमपुरा ठाण्याच्या बोळीत पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची वाहने उभी केली जाते.
---------------
आलेख
अशी झाली ‘नो पार्किंग’मधील वाहनांवर कारवाई
२०१९-
२०२०-
मे २०२१ पर्यंत-
-------------------