पाणीयुक्त इंधनाने बंद पडली वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:13 AM2017-12-13T01:13:55+5:302017-12-13T01:14:13+5:30
परळीतील गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी निघालेल्या भाजप पदाधिका-यांच्या ताफ्यातील वाहनात औरंगाबाद ते बीड रोडवरील भोकरवाडी येथील राजर्षी शाहू पेट्रोलपंपावर पाणीयुक्त इंधन भरल्याचा प्रकार उघडकीस आला. इतर नागरिकांच्या वाहनातही पाणीयुक्त इंधन भरल्यामुळे ती वाहने बंद पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : परळीतील गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी निघालेल्या भाजप पदाधिका-यांच्या ताफ्यातील वाहनात औरंगाबाद ते बीड रोडवरील भोकरवाडी येथील राजर्षी शाहू पेट्रोलपंपावर पाणीयुक्त इंधन भरल्याचा प्रकार उघडकीस आला. इतर नागरिकांच्या वाहनातही पाणीयुक्त इंधन भरल्यामुळे ती वाहने बंद पडली.
औरंगाबाद शहरातील पेट्रोलपंपावर भेसळयुक्त इंधन वाहनात भरण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच उघडकीस आल्यानंतर औरंगाबाद ते बीड रोडवरील पेट्रोलपंप संशयाच्या भोवºयात सापडले आहेत. मराठवाड्यातील सर्वच पेट्रोलपंप तपासण्याची गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे.
इतर वाहनांनी गेवराईपर्यंत प्रवास करून भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ.भागवत कराड, बालाजी मुंडे व इतर पदाधिकारी टॅक्सीने परळीकडे रवाना झाले. त्यांच्या चारचाकीलाही टोचण लावून गेवराईपर्यंत नेल्यानंतर तेथे दुरस्तीसाठी संबंधित वाहन मोबाईल गॅरेजच्या हवाली करण्यात
आले.
राजर्षी शाहू पेट्रोलपंपावर भाजप पदाधिका-यांनी इंधन भरल्यानंतर फॉर्च्युनर चालू झालीच नाही. इतर नागरिकांची वाहनेदेखील इंधन भरल्यानंतर सुरू झाली नाहीत. त्यामुळे वाहनातील इंजिनमध्ये तपासणी केली असता पाणी आणि इंधन एकत्रच बाहेर आले. याप्रकरणी डॉ. कराड यांनी जालना पुरवठा अधिकारी आर. एस. नंदकर यांच्याकडे तक्रार केली. शिवाय हिंदुस्तान पेट्रोलियमचे विक्री व्यवस्थापक थॉमस यांच्याकडेही घडलेला प्रकार सांगितला.
पुरवठा अधिकारी म्हणाले
जालन्याचे पुरवठा अधिकारी नंदकर यांनी सांगितले, औरंगाबादेत एच.पी.चे विक्री अधिका-यांचे कार्यालय आहे. त्यांना याप्रकरणी कळविले आहे. तसेच तलाठी आणि मंडळ अधिका-याला भोकरवाडीतील त्या पेट्रोलपंपावर इंधनाचे नमुने घेण्यासाठी पाठविले आहे.