‘आरटीओ’च्या वाहनांनाच नाही इन्शुरन्स, पीयूसी; इतरांना दंड, कार्यालयीन वाहनांकडे दुर्लक्ष
By संतोष हिरेमठ | Published: March 9, 2023 06:53 PM2023-03-09T18:53:10+5:302023-03-09T18:54:42+5:30
नियम तोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा, दंडात्मक कारवाई
छत्रपती संभाजीनगर : आरटीओ कार्यालयाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, आरटीओ कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी ज्या वाहनांच्या मदतीने प्रवास करतात, ज्यातून इतरांवर कारवाई करतात, त्या वाहनांनाच इन्शुरन्स, पीयूसी नसल्याची धक्कादायक बाब ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमधून समोर आली आहे.
सरकारी आकडेवारीनुसार देशभरात जवळपास ४० ते ५० टक्के वाहने इन्शुरन्स नसतानाही धावत आहे. नियमानुसार प्रत्येक वाहनाचा थर्ड पार्टी विमा असणे आवश्यक आहे. यातून अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी मदत होते. ‘पीयूसी’मुळे प्रदूषण नियंत्रणाला हातभार लागतो. तसेच भंगार वाहने रस्त्यावर धावण्यापासून रोखताही येतात. त्यामुळे पीयूसी, इन्शुरन्स नसणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. आरटीओ कार्यालयाचे पथक ज्या वाहनांतून प्रवास करतात, त्या वाहनांची काय स्थिती आहे, याची पडताळणी ‘वाहन’ ‘परिवहन’ या संकेस्थळाच्या आणि मोबाइल ॲपच्या माध्यमातून करण्यात आली. तेव्हा आरटीओ कार्यालयाचीच काही वाहने पीयूसी आणि ‘इन्शुरन्स’विनाच धावत असल्याचे आढळून आले.
किती वर्षे इन्शुरन्सकडे दुर्लक्ष?
एका वाहनाचे इन्शुरन्श २०११ नंतर नसल्याची ॲपची ऑनलाइन यंत्रणा दाखवित आहे, तर अन्य एका चारचाकीचा इन्शुरन्स २०२१ पर्यंत वैध होता, असे दर्शविते. ‘वाहन’ ‘परिवहन’ या संकेतस्थळावर इन्शुरन्शची स्थितीच दाखवत नाही. फिजिकली डाक्युमेंट पाहावे, अशी सूचना दर्शविली जाते.
काय आढळून आले?
१) वाहन क्रमांक- एमएच-०४, इपी-२२००
या चारचाकी वाहनाची नोंदणी २६ फेब्रुवारी २०१० मध्ये झालेली आहे. फिटनेसची मुदत २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आहे. परंतु, या वाहनाचे इन्शुरन्स आणि पीयूसी या दोन्हींची मुदत संपलेली आढळून आले. मोबाइल ॲपबरोबर शासनाचा संकेतस्थळावरून ही बाब समोर आली.
२) वाहन क्रमांक- एमएच-०४, इपी-२०२०
या चारचाकी वाहनाची नोंदणी २२ जून २०१० मध्ये झालेली आहे. या चारचाकीची २१ जून २०२५ पर्यंत फिटनेसची मुदत आहे. तसेच ८ जुलै २०२३ पर्यंत पीयूसीची मुदत आहे. परंतु, या वाहनांचे इन्शुरन्सच नसल्याचे दिसून आले.