वाहनधारकांनो लक्ष द्या; रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांबाहेरील वाहने पोलीस उचलणार
By मुजीब देवणीकर | Published: October 5, 2023 06:46 PM2023-10-05T18:46:59+5:302023-10-05T18:47:38+5:30
व्यापारी महासंघ, मनपा-पोलिसांची संयुक्त बैठक
छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य रस्त्यांवर पांढरे पट्टे मारण्यात येतील. या पट्ट्यांच्या बाहेर दुचाकी, चारचाकी वाहने उभी असल्याचे निदर्शनास आले, तर कारवाई करण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी रात्री स्मार्ट सिटीच्या कार्यालयात एका बैठकीत घेण्यात आला.
पोलिस आयुक्त मनोज लोहिया, मनपा प्रशासक जी. श्रीकांत, व्यापारी महासंघ पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत पार्किंगला शिस्त लावण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. व्यापारी महासंघाने विविध सण येत आहेत, काही दिवस कारवाई करू नये, अशी मागणी केली. मात्र, ही मागणी मान्य करण्यात आली नाही. शहरातील मुख्य रस्त्यांवर पट्टे नाहीत, असा मुद्दा समोर करण्यात आला. हा मुद्दा ग्राह्य धरून लवकरच सर्व प्रमुख मार्गांवर पट्टे मारण्याचे निश्चित झाले.
पोलिसांच्या सूचनेनुसार ज्या मार्गावर पांढरे पट्टे मारण्याची गरज आहे, तेथे मनपा पट्टे मारून देईल. वाहनावर कारवाई करताना अनाउन्समेंट करणे आवश्यक आहे. वाहन उचलणाऱ्या खाजगी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना गणवेश असावा, हे कर्मचारी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असू नयेत, याची पडताळणी एका दिवसात पाेलिस करून देतील, असेही बैठकीत ठरले. कारवाईच्या वाहनांवर व्हिडीओ कॅमेरा असेल, वाहने उचलताना वेळ, ठिकाण नमूद असल्याचा फोटो काढणे बंधनकारक राहील. दंड भरताना काही शंका असल्यास नागरिकांना पडताळणी करता येईल. सध्या जप्त केलेली वाहने गरवारे मैदान, छावणी येथे नेण्यात येत होती. नागरिकांच्या सोयीसाठी उड्डाणपुलांखाली काही ठिकाणी सोय करण्यात येईल.
असे असतील दंड
वाहतूक पोलिसांकडून सणांसाठी तात्पुरत्या स्वरूपात काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून दिली जाणार आहे. नागरिकांना वाहन परत देताना मालकी हक्कासंदर्भात पडताळणी केली जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. दुचाकीसाठी २०० रुपये, हातगाड्या ३००, चारचाकीला जामर लावला तर ५०० रुपये, वाहन टोइंग करून नेल्यास २ हजार रुपये दंड राहील. याशिवाय नो पार्किंगमध्ये वाहन असेल तर वेगळा दंड आकारला जाईल.