वाहने सापडली, मालक हरवले!
By Admin | Published: May 4, 2016 12:02 AM2016-05-04T00:02:41+5:302016-05-04T00:10:00+5:30
बीड : हरवलेला, चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळविण्यासाठी पोलिसांच्या मागे एरवी लकडा लावावा लागतो; परंतु सध्या पोलीस यंत्रणा वेगळ्याच कारणाने त्रस्त आहे.
पोलिसांकडून शोधाशोध: जिल्ह्यात चार वर्षांत ४८४ वाहने आढळली बेवारस
बीड : हरवलेला, चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळविण्यासाठी पोलिसांच्या मागे एरवी लकडा लावावा लागतो; परंतु सध्या पोलीस यंत्रणा वेगळ्याच कारणाने त्रस्त आहे. जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत ४८४ बेवारस वाहने आढळली आहेत. मात्र, मूळ मालकच सापडत नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून आता वाहनमालकांची शोधाशोध सुरु आहे.
मागील चार वर्षांत विविध ठाण्यांतर्गत ही बेवारस वाहने पोलिसांना बेवारसस्थितीत सापडली आहेत. यापैकी काही वाहनांवर क्रमांकही नाहीत. त्यामुळे या वाहनांचे मूळ मालक शोधण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. यापैकी काही वाहने अपघातातील असून काही वाहनांचा वापर अवैध धंद्यांसाठी व इतर गुन्ह्यांसाठी वापरली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. अनेकदा गुन्हेगार गुन्ह्यासाठी वाहनांचा वापर करतात, गुन्हा केल्यानंतर वाहने बेवारस स्थितीत सोडून पसार होतात. अशा वाहनांचाच यात सर्वाधिक भरणा आहे.
४८४ बेवारस वाहनांमध्ये चार चारचाकी तर चार तीनचाकी वाहनांचा समावेश आहे. उर्वरित सर्व दुचाकी वाहने आहेत. मूळ मालकांनी कागदपत्रे सादर केल्यास त्यांना ही वाहने परत केली जाणार आहेत.
बेवारसरित्या आढळलेल्या वाहनांची ओळख पटविणे सुरु आहे. त्यासाठी वाहनाचा प्रकार, पासींग, चेसीज, इंजीन क्रमांक आदीची माहिती पोलीस संकेतस्थळावर टाकली आहे. मूळ कागदपत्रांसह पोलीस प्रशासनाशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
‘त्या’ वाहनांचा लिलाव
सध्या सर्व बेवारस वाहने विविध ठाण्यांमध्ये धूळखात आहेत. त्यामुळे ठाण्यांच्या आवारातील जागा गुंतून पडली आहे. शिवाय सुटे भाग चोरीला जाण्याचीही शक्यता आहे. वाहनांची ओळख पटविण्यासाठी महिन्याची मुदत आहे. त्यानंतर बेवारस वाहनांचा लिलाव केला जाणार आहे.