तोंडोळी अत्याचार खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार; महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी घेतली पीडितांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 12:14 PM2021-10-23T12:14:15+5:302021-10-23T12:16:44+5:30
Rupali Chakankar News : मन्न सुन्न करणाऱ्या तोंडोळी येथील अत्याचार प्रकरणात पोलिसांनी दरोडेखोरांचा म्होरक्या आणि इतर एकाला ताब्यात घेतले आहे.
औरंगाबाद : तोंडोळी येथील दरोडा आणि महिलांवरील सामुहिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. राज्यभरातून आरोपींना तत्काळ ताब्यात घेऊन कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar) यांनी तोंडोळी येथील पीडितांची भेट आज सकाळी भेट घेतली. यावेळी त्यांनी अत्याचाराचा हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याची माहिती दिली.
मन्न सुन्न करणाऱ्या तोंडोळी येथील अत्याचार प्रकरणात पोलिसांनी दरोडेखोरांचा म्होरक्या आणि इतर एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आणखी सहा आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, आज सकाळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तोंडोळी पीडितांची आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी चाकणकर यांनी अत्याचार करणाऱ्या नराधमांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालविण्यात येणार अशी माहिती दिली. तसेच दरोडा आणि अत्याचाराने पिडीत कुटुंबाना मनोधैर्य योजनेतून आर्थिक सहाय्य देण्यात येईल असे आश्वासन दिले.
कसे घडले तोंडोळी अत्याचार प्रकरण
१९ ऑक्टोबरच्या रात्री या टोळीने तोंडोळी येथे मध्यप्रदेशातून कामासाठी आलेल्या कुटुंबातील दोन महिलांवर सामूहिक अत्याचार करीत लुटमार केली होती. त्यापूर्वी प्रभूची टोळी बिडकीन परिसरात दोन दुचाकीवरून एका ठिकाणी जमा झाली. सुरुवातीला टोळीने गिधाडा शिवारात एका शेतावर लुटमार केली. तेथून लोहगावकडे जाताना एका वस्तीवर लुटमार करीत हजार रुपये आणि दुचाकी पळवली. तेथून तीन चार ठिकाणी चोरी करीत तोंडोळी येथील शेतवस्तीवर टोळी पोहोचली. तेथे लुटमार आणि महिलांवर अत्याचार केल्यानंतर दुचाकीवरून पोबारा केल्याची कबुलीही मुख्य आरोपीने दिल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात आणखी सहा जणांचा पोलीस शोध सुरु आहे.