वेताळवाडी : निसर्ग सौंदर्याने नटलेला दुर्लक्षित किल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:02 AM2021-09-18T04:02:17+5:302021-09-18T04:02:17+5:30
मराठवाडा आणि खान्देश यांना विभागणाऱ्या अजिंठा डोंगररांगांत अत्यंत लक्षवेधी असा वेताळवाडीचा किल्ला आहे. या किल्ल्याला स्थानिक लोक वसईचा किल्ला ...
मराठवाडा आणि खान्देश यांना विभागणाऱ्या अजिंठा डोंगररांगांत अत्यंत लक्षवेधी असा वेताळवाडीचा किल्ला आहे. या किल्ल्याला स्थानिक लोक वसईचा किल्ला किंवा वाडी किल्लासुद्धा म्हणतात. हळदा घाटातील तिन्ही दिशेने डोंगर रांगांनी हा किल्ला वेढलेला आहे. सध्या या किल्ल्याची तटबंदी आणि दोन भव्य दरवाजे, आतील जलमहाल चांगल्या स्थितीत आहेत. अजिंठा डोंगररांगांमध्ये पर्यटन करताना तितकासा प्रसिद्ध नसला तरी दुरून पाहिल्यावर या किल्ल्याकडे जाण्याचा मोह नक्कीच होतो.
काय पाहाल -
किल्ल्याची संपूर्ण तटबंदी दुरूनच दिसते आणि त्याची भव्यता लक्षात येते. आत गेल्यास भव्य भक्कम बुरूज पहिल्यांदा आपले लक्ष वेधून घेतो. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार तीन बुरुजांच्या त्रिकोणी रचनेतून तयार झालेले आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार, द्वारपालाचे दालन, मुख्य बुरुजावर टेहेळणीसाठीचे ठिकाण यावरून किल्ल्याची कल्पक स्थापत्यशैली दिसून येते. पुढे धान्य साठवणुकीचे दोन भव्य दालन आहेत. दगडी चिऱ्याचे अष्टकोनी बांधीव तळे आहे. त्याच्या एका बाजूला ‘जलमहाल’ आहे. पुढे ‘हवामहाल’चे अवशेष आढळून येतात. यावरून किल्ल्याची तत्कालीन समृद्धी लक्षात येते. किल्ल्यावर एक तोफसुद्धा आहे. किल्ल्याच्या उजव्या बाजूस असलेली प्रसिद्ध रुद्रेश्वर लेणी आणि आकर्षक धबधबा दिसून येतो. दूरवर पसरलेली तटबंदी, नागमोडी हळदा घाट आणि वेताळवाडी धरणाचा नजारा अनुभवायला मिळतो. पावसाळ्यात या किल्ल्यावरील निसर्गरम्य वातावरण मोहीत करते.
कसे जाल -
औरंगाबादपासून ६५ किमी अंतरावर सिल्लोड गाव आहे. सिल्लोडच्या पुढे १४ किमीवर गोळेगाव आहे. येथून उंडणगाव ५ किमीवर आहे. उंडणगावहून १२ किमीवर हळदा घाटात ३ किमी अंतरावर वेताळवाडी किल्ला आहे. तसेच फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव आहे. येथून वेताळवाडी अंतर ४ किमी आहे.