घाटनांद्रा येथे ५५ वर्षापूर्वीच्या जीर्ण इमारतीमध्येच चालतो पशुवैद्यकीय दवाखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 08:42 PM2019-01-25T20:42:45+5:302019-01-25T20:45:32+5:30
इमारतीची दुरूस्ती न करताना नवीन इमारतीसाठी निधी द्यावा, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.
घाटनांद्रा (औरंगाबाद ) : जवळपास ५५ वर्षापूर्वी बांधलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीची प्रशासनाने पाचव्यांदा डागडुजी सुरू केल्याचा प्रकार उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे मोडकळीस असलेल्या या इमारतीची दुरूस्ती नव्हे तर नवीन इमारत बांधण्याची गरज असून पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन इमारतीची दुरूस्ती न करताना नवीन इमारतीसाठी निधी द्यावा, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.
येथील पशुपालकांनी सांगितले की, घाटनांद्रा येथील पशूवैद्यकीय दवाखान्याच्या ५० वर्ष जून्या इमारतीवर शासनाने केवळ दुरूस्तीवर आतापर्यंत लाखो रुपये खर्च केले आहे. आतापर्यंत पाच ते सहा वेळेच या इमातरीची दुरूस्ती झाली असून आता पुन्हा या जीर्ण झालेल्या इमारतीसाठी शासनाने पाच लाख रूपये निधी देऊन केला आहे. मात्र, या निधीमध्ये थातुरमातुर काम होत असल्याने शासनाने पडण्याच्या मार्गावर असलेल्या इमारतीच्या दुरूस्तीऐवजी नवीन इमारतीसाठीच निधी द्यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
येथील बसस्थानक परिसरात ११ गुंठे मालकीची जागा आसलेले या पशूवैद्यकीय श्रेणी एकचा दवाखान्याची ६०० ते ७०० स्क्वेअर फूट आकाराची १९६४ मध्ये बांधकाम झालेली ईमारत आहे. ११ गुंठे मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यानेही ईमारत चोही बाजूंनी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. मात्र, शासनाच्या वतीने हे अतिक्रमण काढण्याच्या कोणत्याच हालचाली होत नाही, याबाबत येथील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
दुरूस्तीचा खर्च जाणार पाण्यात
- ५५ वर्ष जुन्या या इमारतीचे दुरूस्ती केल्यानंतर खर्च पूर्णपणे पाण्यात जाणार आहे. इमारतीच्या स्लॅबला जागोजागी तडे गेल्यामुळे दुरूस्तीनंतर पावसाळ्यात स्लॅब गळतो. तसेच इतर कामेही थातुरमातूर पद्धतीने केली जात असल्याने दुरूस्तीचा कोणताही फायदा होत नाही. मात्र, तरीही प्रशासन नवी इमारत न बांधून देता वारंवार दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून देत आहे. याबद्दल नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. त्याऐवजी नवीन इमारत बांधुन द्यावी, अशी मागणी होत आहे.
नविन इमारती विषयी जि.प. चे उपविभागीय अभियंता कल्याण भोसले म्हणाले, दूरूस्तीचे काम चांगल्या प्रकारचे करण्यात येणार असून नवीन इमारतीसाठी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिल्यास प्रस्ताव तयार करून शासनाकडून इमारतीसाठी मागणी करण्यात येईल.