धोरणात्मक निर्णय घेण्यास कुलगुरूंना बंधन?; ऐनवेळी व्यवस्थापन परिषदेची बैठक रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 07:11 PM2019-05-11T19:11:58+5:302019-05-11T19:14:39+5:30
धोरणात्मक निर्णय घेण्यास राज्यपाल कार्यालयाने बंधन घातल्याची माहिती सूत्रांनी दिली
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा अल्प कालावधी राहिला असल्यामुळे नेमणुका, मोठी खरेदी किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यास राज्यपाल कार्यालयाने बंधन घातल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीला सुरुवात होण्यापूर्वीच रद्द करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची स्थगित बैठक शुक्रवारी आयोजित केली होती. ही बैठक घेण्यात येऊ नये, अशी मागणी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे, संजय निंबाळकर, डॉ. राजेश करपे, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. नरेंद्र काळे आदींनी केली होती. मात्र सर्वांची मागणी धुडकावून बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी डॉ. सलामपुरे हे हिमाचल प्रदेश येथून हजर झाले. डॉ. काळे यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दर्शविला. बैठकीला शुक्रवारी सकाळी सुरुवात होण्यापूर्वीच किशोर शितोळे यांनी आचारसंहिता भंग होण्याची शक्यता असून, बैठक घेणे नैतिकतेच्या विरोधात असल्याचे सांगितले. यानंतर कुलगुरूंनी कुलसचिवांना बैठक पुढे ढकलण्यात येत असल्याचे संदेश पाठविण्याचे आदेश दिले.
यानुसार व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे संदेश सकाळी ११.२० वाजता पाठविण्यात आले. यावर सदस्य डॉ. शंकर अंभोरे यांनी आक्षेप घेतला. सर्व सदस्य आले आहेत, त्यांना टीए, डीएचा खर्च द्यावा लागणार, आचारसंहिता भंग होणार होती तर बैठक कशासाठी आयोजित केली? असा सवाल केला. यावरही कुलगुरूंनी बैठक रद्द करण्याची ठाम भूमिका घेतली. बैठक रद्द केल्यामुळे आचारसंहिता भंगाच्या तांत्रिक अडचणीपासून विद्यापीठ प्रशासनाची सुटका झाली. तसेच विद्यापीठाची होणारी बदनामी टळली असल्याची प्रतिक्रिया संजय निंबाळकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान सदस्य किशोर शितोळे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल तथा कुलपतींकडे निवेदन देऊन कुलगुरूंचा कार्यकाळ अल्प राहिला असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या नियुक्त्या, धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत, अशी मागणी केली होती. या मागणीनुसार राज्यपाल कार्यालयाने कुलगुरूंना कोणतेही धोरणात्मक निर्णय न घेण्याची सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आलेल्या पत्रालाही कुलगुरूंच्या कार्यालयाने उत्तर दिले. मात्र त्यानंतरही धोरणात्मक निर्णय, नेमणुका न करण्याची भूमिका कुलपती कार्यालयाने घेतली. यामुळे शुक्रवारी आयोजित केलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीला या पत्राची किनार असल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.
कुलसचिव, परीक्षा संचालकांच्या मुलाखती थंडबस्त्यात
विद्यापीठाच्या पूर्णवेळ कुलसचिव नेमण्यासाठी मुलाखती आयोजित करण्याच्या हालचाली सुरूहोत्या. पाच वर्षे पूर्णवेळ कुलसचिव नेमण्यात आलेला नसताना महिनाभरापेक्षा कमी कालावधी राहिला असता कुलसचिव नेमू नये, अशी आग्रही भूमिका व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे यांच्यासह इतरांनी घेतली होती. तरीही दोन वेळा व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित करून कुलसचिव निवड समितीवर एका सदस्याची निवड करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र शुक्रवारी आयोजित केलेली बैठक रद्द झाल्यामुळे कुलसचिव, परीक्षा संचालकपदाच्या मुलाखती रद्द झाल्यात जमा असल्याचे स्पष्ट झाले.
कुलगुरूंनी आदेश दिल्यामुळे व्यवस्थापन परिषदेची बैठक रद्द करण्यात आली. ही बैठक का रद्द करण्यात आली, याची माहिती नाही. कुलगुरूंच्या आदेशाप्रमाणे सदस्यांना संदेश पाठविण्यात आले. तसेच कुलपती कार्यालयाचे काही दिवसांपूर्वी एक पत्र आले होते. त्यानंतर पुन्हा कोणते पत्र आले का, याची माहिती नाही.
- डॉ. साधना पांडे, प्रभारी कुलसचिव