‘बाटू’चे कुलगुरू गायकर यांचा राजीनामा फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:36 AM2018-10-27T00:36:07+5:302018-10-27T00:38:12+5:30
रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) कुलगुरू डॉ. विलास जी. गायकर यांनी उच्चशिक्षण विभागाच्या कारभारला कंटाळून राज्यपालांकडे राजीनामा दिला होता. हा राजीनामा फेटाळण्यात आला आहे. कुलगुरूंनी केलेल्या विकासात्मक मागण्याही उच्चशिक्षण विभागाने मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
औरंगाबाद : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) कुलगुरू डॉ. विलास जी. गायकर यांनी उच्चशिक्षण विभागाच्या कारभारला कंटाळून राज्यपालांकडे राजीनामा दिला होता. हा राजीनामा फेटाळण्यात आला आहे. कुलगुरूंनी केलेल्या विकासात्मक मागण्याही उच्चशिक्षण विभागाने मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उच्चशिक्षण विभागाच्या कारभाराला कंटाळून लोणेरे येथील ‘बाटू’ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गायकर यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये २१ आक्टोबर रोजी प्रकाशित झाले होते. उच्चशिक्षण विभागाने बाटूचे कुलसचिव डॉ. सुनील भांबरे यांच्याकडील पदभार काढत त्यांची नियुक्ती पेन येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी केली. डॉ. भांबरे यांच्याकडे प्राचार्य आणि कुलसचिव या दोन्ही पदांची जबाबादरी ठेवण्याची विनंती कुलगुरू डॉ. गायकर यांनी केली होती. मात्र, ही विनंती धुडकावून लावली. यामुळे संतापलेल्या डॉ. गायकर यांनी तडकाफडकी राज्यपालांकडे राजीनामा पाठविला. याचवेळी विद्यापीठात प्रकुलगुरू, वित्त व लेखाधिकारी, अधिष्ठाता, विभागीय संचालक यांच्यासह इतर सर्व पदे मंजूर असतानाही भरण्यास मंजुरी देण्यात येत नाही. विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयांसाठी जागा मिळत नाही. विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास निधी देत नाहीत. याचवेळी राज्यातील तीन विधि विद्यापीठे, आयटीसीच्या विभागीय केंद्रासाठी जागा, निधी, पदे तात्काळ मंजूर केली जातात. ‘बाटू’सोबतच सरकार दुजाभावाने वागत असल्यामुळे त्रासलेल्या कुलगुरूंनी राजीनामा देण्याचे हे टोकाचे पाऊल उचलले होते. याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये येताच खळबळ उडाली होती. शेवटी उच्चशिक्षण विभागाचे मंत्री विनोद तावडे, सचिवांमध्ये बैठक झाल्यानंतर डॉ. गायकर यांना राजीनामा न देता काम करण्याची विनंती करण्यात आल्याचे समजते. तसेच डॉ. भांबरे यांची बदलीही थांबवत त्यांच्याकडे कुलसचिवपदाचा कार्यभार कायम ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोट,
मी राजीनामा दिला होता. मात्र, माझ्या ज्या काही मागण्या होत्या. त्याबाबत सकारात्मक पावले उच्चशिक्षण विभागाकडून उचलण्यात आली आहेत. तसेच मला उर्वरित कालावधी पूर्ण होईपर्यंत कायम राहण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. सध्या तरी मी कार्यरत आहे.
- डॉ. विलास गायकर, कुलगुरू, बाटू