नामविस्तार दिनी कुलगुरूंचे विद्यार्थ्यांना गिफ्ट; कमवा शिका योजनेच्या मानधनात वाढ
By योगेश पायघन | Published: January 14, 2023 12:52 PM2023-01-14T12:52:53+5:302023-01-14T12:54:59+5:30
वाढत्या महागाईत विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न
औरंगाबाद : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कमवा शिका योजनेत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना १ एप्रिल पासून मानधन १ हजार रुपयांनी वाढवण्याचा निर्णय नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमात कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी जाहीर केला. नामविस्तार दिनी होतकरू विद्यार्थ्यांना कुलगुरूंनी गिफ्ट दिल्याने विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
कमवा शिका विद्यार्थ्यांना प्रतिदिन ७० रुपये दिले जात आहेत. वाढत्या महागाईत विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहेत. विद्यार्थ्यांना १०० रुपये प्रतिदिन मानधन देण्याचा निर्णय घेत असून येत्या व्यवस्थापन परिषदेत यासंबंधी मंजुरी घेऊन पुढील आर्थिक वर्षात हा निर्णय लागू होईल असे कुलगुरू डॉ प्रमोद येवले म्हणाले. निर्णय जाहीर करताच उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाट करून निर्णयाचे स्वागत केले.
१७ जानेवारीपासून ऑनलाइन मूल्यांकन
१७ जानेवारीपासून ऑनस्क्रीन इव्हॅल्यूएशन प्रायोगिक तत्वावर सुरू करत आहोत. सुरुवातीला व्यावसायिक पदव्युत्तर पदवी आणि विद्यापीठ विभागाच्या परिक्षापासून सुरुवात होईल. ऑनलाइन मूल्यांकन केल्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीत चूका दूर होतील. याचा पायलट प्रकल्प नागपूर विद्यापीठात मी यशस्वी केल्याने तो इथेही यशस्वी होईल असे कुलगुरू डॉ प्रमोद येवले म्हणाले.