कुलगुरूंनी मांडला पंचवार्षिक ‘व्हिजन प्लॅन’
By Admin | Published: June 19, 2014 12:40 AM2014-06-19T00:40:23+5:302014-06-19T00:52:22+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘अ’ दर्जाचे मानांकन मिळवून महाराष्ट्रात शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘अ’ दर्जाचे मानांकन मिळवून महाराष्ट्रात शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. आगामी पाच वर्षांत संशोधन व नावीन्याचा शोध या माध्यमातून भारतातील टॉप टेन विद्यापीठांत येण्यासाठी आपण सर्व जण मिळून सामूहिक प्रयत्न करूया, असा विश्वास कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी व्यक्त केला.
विद्यापीठाची कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच डॉ. चोपडे यांनी प्राध्यापक, विभागप्रमुखांशी संवाद साधला. विद्यापीठ नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास कुलसचिव डॉ. धनराज माने, बीसीयूडी संचालक डॉ. एस.पी. झांबरे यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी डॉ. अशोक चव्हाण, डॉ. एस.टी. सांगळे, डॉ. किशन धाबे, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. रत्नदीप देशमुख यांच्यासह दोनशेहून अधिक प्राध्यापक उपस्थित होते. कुलगुरूंनी २०१४ ते २०१९ या काळातला व्हिजन प्लॅन कुलगुरूंनी मांडला. त्यांनी सांगितले की, भारतातील साडेपाचशेपैकी केवळ ६५ विद्यापीठांना ‘अ’ दर्जाचे मानांकन आहे. यात आपले विद्यापीठ हे ग्रामीण पार्श्वभूमी असलेले एकमेव आहे. उत्कृष्ट संशोधन व नावीन्यातून शोध या माध्यमातून आपण नाव मिळवू शकतो. यासाठी २५ वर्षांचे संशोधनाचे नियोजन करावे लागेल. ५० तरुण प्राध्यापक तसेच २५ अॅडजंक्ट प्रोफेसर व प्रतिवर्षी १०० विद्यार्थ्यांना संशोधन छात्रवृत्ती देण्यात येईल. परिसरात रिसर्च पार्कची स्थापना, उद्योजकीय कौशल्यतेचा विकास, बायोटेक व नॅनोटेक संस्थांची स्थापना करण्यात येईल. व्यवसाय मार्गदर्शन, परीक्षा पद्धतीत सुधारणा, जैविक विविधता, योगा, सौरऊर्जा, लिबरल आर्टस्, कौशल्य व विकास यावर आधारित अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहेत. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, केंद्र व राज्य सरकार आणि बहि:स्थ शिक्षणाच्या माध्यमातून आगामी पाच वर्षांत १ हजार कोटींचा निधी उभारण्याचा मानस कुलगुरू डॉ. चोपडे यांनी व्यक्त केला. सुमारे दीड तासाच्या व्याख्यानात कुलगुरूंनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून ‘रोड मॅप’ आखला. कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली सर्व जण मिळून विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर नेण्यात यशस्वी होऊ, असे कुलगुरू डॉ. धनराज माने म्हणाले.