औषधनिर्माण शास्त्रात कुलगुरूंना पेटंट जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:02 AM2021-02-26T04:02:11+5:302021-02-26T04:02:11+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना औषधनिर्माण शास्त्र विषयातील संशोधनाबद्दल भारत सरकारच्या ‘इंटेलेक्च्युअल ...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना औषधनिर्माण शास्त्र विषयातील संशोधनाबद्दल भारत सरकारच्या ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑफ इंडिया’ने पेटंट जाहीर केले आहे. कुलगुरू पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरचे त्यांच्या नावावरचे हे दुसरे पेटंट असून आणखी पाच पेटंटसाठी त्यांनी यापूर्वीच प्रस्ताव दाखल केलेले आहेत.
यासंदर्भात भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाच्या नियंत्रकांनी २४ फेब्रुवारी रोजी डॉ. प्रमोद येवले यांना पेटंट प्राप्त झाल्याचे जाहीर केले आहे. डॉ. येवले यांनी या कार्यालयाकडे ७ सप्टेंबर २०१५ रोजी ‘सिंथेसिस ऑफ चिताेसॅन ग्राफ्ट एचपीबीसीडी को पॉलिमर बाय वन पॉट सिंथेसिस टेक्निक फॉर सॉल्युबिलिटी एन्हान्समेंट ऑफ ऑफेफॅविरेन्ज’ या औषधनिर्माण शास्त्रातील संशोधनाबद्दल पेटंटसाठी प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावास पेटंट कार्यालयाने २४ फेब्रुवारी रोजी मान्यता दिली. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्यासह त्यांचे संशोधक विद्यार्थी डॉ. आरती बेलगमवार व डॉ. शगुफ्ता खान यांनीही या पेटंटसाठी संशोधन कार्य केले आहे. या पेटंटचे हक्क २० वर्षांसाठी असणार आहेत.
यापूर्वी १ मार्च २०२० रोजी ‘प्रोसेस फॉर प्रिपरेशन ऑफ इंटरनल इफाविटेन्झ नॅनो पार्टीकल्स फॉर सीएनएस टार्गेरिंग इन न्युरो एड्स’ या डॉ. येवले यांच्या संशोधनास ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडिया‘ने पेटंट जाहीर केले होते. यासाठी ७ डिसेंबर २०१६ रोजी प्रस्ताव दाखल करण्यात आलेला होता. या पेटंटचा अवधी देखिल २० वर्षांचा आहे.