१० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मिळाले कुलगुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:29 PM2019-07-15T23:29:05+5:302019-07-15T23:29:48+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी शोध समितीने शिफारस केलेल्या पाच उमेदवारांच्या मुलाखतीनंतर १० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती केली. ते मंगळवारी (दि. १६) सकाळी १०.३० वा. पदभार घेणार आहेत.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी शोध समितीने शिफारस केलेल्या पाच उमेदवारांच्या मुलाखतीनंतर १० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती केली. ते मंगळवारी (दि. १६) सकाळी १०.३० वा. पदभार घेणार आहेत.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ ३ जून २०१९ रोजी पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. याचदरम्यान कुलगुरू निवडीसाठी कुलपती तथा राज्यपालांनी शोध समिती स्थापन केली होती. सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमूर्ती अनिल दवे, नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), दिल्लीचे संचालक प्रवीणकुमार आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या समितीने कुलगुरूपदासाठी नामांकन दाखल केलेल्या १२६ पैकी १८ जणांना ३० जून रोजी मुलाखतीसाठी बोलावले. यातील ५ नावांची शिफारस राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांच्याकडे समितीने केली. यात डॉ. येवले यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी बीसीयूडी संचालक डॉ. के.व्ही. काळे, नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संचालक डॉ. धनंजय माने, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. विजय फुलारी आणि नांदेड येथील गुरू गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रघुनाथ होळंबे यांचा समावेश होता. या उमेदवारांच्या मुलाखती राज्यपालांनी ५ जुलै रोजी घेतल्या होत्या. यानंतर ‘स्थानिक की बाहेरील’ यात निवड रखडली होती. डॉ. काळे आणि डॉ. माने यांनीही निवड होण्यासाठी राजकीय पाठिंबा मिळवला होता. डॉ. काळे यांच्यासाठी स्थानिक भाजप प्रयत्न करीत होता, तर डॉ. माने यांच्यासाठी उस्मानाबाद शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तगादा लावला होता. यात डॉ. येवले यांनी बाजी मारली.
महामानवाच्या नावाच्या विद्यापीठात काम करण्याची संधी
महामानवाचे नाव असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी काम करण्याची संधी कुलपतींनी दिली, याचा मनस्वी आनंद आहे. मराठवाडा आणि विदर्भ हे दोन्ही भाग सारखेच आहेत. मराठवाड्यातील युवकांना रोजगारक्षम करण्यावर अधिक भर दिला जाईल. विद्यापीठ निव्वळ पदवी वाटणारे नव्हे, तर रोजगार देणारे केंद्र करण्याचा प्रयत्न असेल.
- डॉ. प्रमोद येवले, नवनियुक्त कुलगुरू