राजकीय हस्तक्षेपामुळे रखडली कुलगुरूची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 07:02 PM2019-07-13T19:02:45+5:302019-07-13T19:04:49+5:30
विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीमध्ये पहिल्यांदाच शिवसेनेची उडी
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी कुलपती सी. विद्यासागर राव पाच सदस्यांच्या मुलाखती घेऊन आठ दिवस उलटून गेले तरी अद्यापही कुलगुरूची निवड झालेली नाही. राजकीय हस्तक्षेपामुळे निवडीला विलंब होत असल्याची चर्चा आता विद्यापीठ वर्तुळात होऊ लागली आहे.
कुलगुरू निवडीमध्ये औरंगाबाद शहरातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी स्थानिक उमेदवारांचे नाव पुढे केले आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचा आग्रह मुख्यमंत्री कार्यालयाकडे केला आहे. याच वेळी नागपूरच्या विद्यापीठाचे विद्यमान प्रकुलगुरू असलेले डॉ. प्रमोद येवले यांच्यासाठी नागपूरमधील राजकीय नेतृत्व आग्रही असल्यामुळे ही निवड रखडल्याची माहिती समोर येत आहे. कुलपती तथा राज्यपालांच्या आदेशाने स्थापन झालेल्या कुलगुरू शोध समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे संचालक डॉ. धनंजय माने, कोल्हापूर येथील भौतिकशास्त्राचे डॉ. विजय फुलारी, नांदेड येथील गुरूगोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रघुनाथ होळंबे आणि नागपूर येथील विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या नावाची शिफारस केली होती.
या पाच उमेदवारांच्या मुलाखती ५ जुलै रोजी राजभवनात सायंकाळी पाच वाजता घेण्यात आल्या. या मुलाखतीनंतर गुणवत्तेच्या आधारावर त्याच दिवशी सायंकाळी राज्यपाल कार्यालयाने नावाची घोषणा करणे अपेक्षित असताना ही निवड आठ दिवसांपर्यंत रखडली आहे. मुलाखतीनंतर दुसऱ्याच दिवशी राज्यपाल हैदराबादच्या दोनदिवसीय दौऱ्यावर गेले. यानंतर सोमवारी (दि.८) निवड होण्याची शक्यता होती. मात्र मराठवाड्यातील भाजपच्या एका बड्या नेत्याने ही निवड तात्काळ होणार नसल्याचे सूचित केले होते. त्यानुसार ही निवड लांबली आहे. या निवडीमध्ये राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात होत असून, समर्थक उमेदवारांची वर्णी लावण्यासाठी मंत्र्यांच्या जोरबैठका सुरूअसल्याचेही समजते. शोध समितीने निवडलेल्या काही उमेदवारांच्या विरोधात अनेक तक्रारींचा पाऊसही कुलपती कार्यालयाकडे पडला. स्पर्धेत असलेल्या डॉ. येवले आणि डॉ. काळे यांच्या विरोधात काही जणांनी मोहीमही राबविल्याचे समोर आले आहे.
शिवसेनेचाही आग्रह
विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीमध्ये पहिल्यांदाच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत एका नावाचा आग्रह धरला असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात एकाही विद्यापीठाचे कुलगुरू शिवसेनेच्या सूचनेवर नेमण्यात आले नसल्याचा मुद्दा समोर आला आहे.