कुलगुरू दौरा;अधिसभा वेठीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:09 AM2018-03-22T00:09:46+5:302018-03-22T10:59:19+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थसंकल्पासाठी आयोजित अधिसभेची बैठक सहा वाजेनंतर स्थगित करून दुसऱ्या दिवशी घेण्याची मागणी सदस्यांनी केली; मात्र कुलगुरूंनी स्वत:च्या दिल्ली दौ-यासाठी बैठक स्थगित करण्यास नकार देत जोपर्यंत कामकाज पूर्ण होत नाही तोपर्यंत सभागृह चालविण्याची घोषणा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थसंकल्पासाठी आयोजित अधिसभेची बैठक सहा वाजेनंतर स्थगित करून दुसऱ्या दिवशी घेण्याची मागणी सदस्यांनी केली; मात्र कुलगुरूंनी स्वत:च्या दिल्ली दौ-यासाठी बैठक स्थगित करण्यास नकार देत जोपर्यंत कामकाज पूर्ण होत नाही तोपर्यंत सभागृह चालविण्याची घोषणा केली. याचा विरोध करीत ज्येष्ठ सदस्य भाऊसाहेब राजळे यांच्यासह बहुतांश महिला सदस्यांनी बहिष्कार टाकला. यानंतर मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांनी अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.
विद्यापीठाच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यासाठी अधिसभेची बैठक मंगळवारी (दि.२०) आयोजित केली होती. या बैठकीत इतरही विषय होते. या विषयांवर चर्चा खूप वेळ लांबली. संध्याकाळचे सहा वाजले तरी अर्थसंकल्प सादरच करण्यात आला नव्हता. यामुळे बहुतांश सदस्यांनी ही बैठक सलग दुसºया दिवशी घेण्याचा प्रस्ताव मांडला; मात्र कुलगुरूंनी आपण दुसºया दिवशी विद्यापीठात उपस्थित नाही, यामुळे रात्री कितीही वाजले तरी कामकाज चालविण्याची तयारी असल्याचे सांगितले; मात्र विद्यापीठाच्या कायद्याप्रमाणे काही विषय शिल्लक राहिले असतील तर तहकूब केलेले सभागृह १५ दिवसांच्या आत कोणत्याही दिवशी भरवून विषय पूर्ण करता येतात. कुलगुरूंच्या वेळेनुसार बैठक बोलवावी, अशी मागणी भाऊसाहेब राजळे यांनी केली. यासही कुलगुरूंनी नकार दर्शवीत काहीही करून आजच सर्व कामकाज संपविणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे राजळे यांच्यासह इतर महिला सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. रात्री दहा वाजता विद्यापीठाचा अर्थसंकल्प वित्त व लेखाधिकारी डॉ. नंदकुमार राठी यांनी मांडला. या अर्थसंकल्पातील विविध तरतुदींवर चर्चा झाल्यानंतर मध्यरात्री बारा वाजेनंतर अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. कुलगुरूंच्या दिल्ली दौºयासाठी संपूर्ण सभागृहाच्या सदस्यांना वेठीला धरल्याचा आरोप राजळे यांनी केला आहे, तसेच घडलेल्या सर्व प्रकारची माहिती कुलपती तथा राज्यपाल यांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी एक कोटी
विद्यापीठात नियोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी अर्थसंकल्पात ४० लाख रुपयांची तरतूद केली होती. याविषयीचा प्रश्न सदस्य डॉ. गोंविद काळे यांनी उपस्थित केला. यावर झालेल्या चर्चेत हा निधी वाढविण्याची मागणी डॉ. राजेश करपे, विजय सुबुकडे यांनी केली. यावर सर्वानुमते एक कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच याविषयी भास्कर दानवे, प्रा.सुनील मगरे, डॉ. जितेंद्र देहाडे,
प्रा. संभाजी भोसले, कपिल आकात यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
सामाजिक शास्त्रे विषयात पदव्युत्तर सीईटी रद्द
विद्यापीठातर्फे आगामी वर्षात सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व सीईटी घेण्याचा निर्णय झाला होता; मात्र याविषयी प्रा. सुनील मगरे यांनी ठराव मांडत सामाजिक शास्त्र विषयामध्ये प्रवेशच होत नाहीत, तर सीईटीला विद्यार्थी कोठे मिळणार? असा सवाल उपस्थित करीत सामाजिक शास्त्रातील सीईटी रद्द करण्याची मागणी केली. हा ठरावही बहुमताने मंजूर करण्यात आला. यामुळे आता केवळ विज्ञान आणि वाणिज्य अभ्यासक्रमातील प्रदव्युत्तरसाठी सीईटी असणार आहे.