डेंग्यूने घेतला बालकाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:14 AM2017-10-30T00:14:18+5:302017-10-30T00:14:50+5:30
श्लोक जयदीप पवार या चारवर्षीय बालकाचा डेंग्यूने मृत्यू झाला. ही घटना बीडमधील शिपाई कॉलनीत घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : काका-पुतण्याच्या वादात शहरातील स्वच्छता रखडली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य होऊन डासाची उत्पत्ती वाढली. यामुळेच श्लोक जयदीप पवार या चारवर्षीय बालकाचा डेंग्यूने मृत्यू झाला. ही घटना बीडमधील शिपाई कॉलनीत घडली. यामुळे न.प.च्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
श्लोक पवारला शनिवारी सकाळी ताप आला. आई-वडिलांनी त्याला तात्काळ शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले; परंतु त्याच्या प्रकृतीत कसलीही सुधारणा झाली नाही. त्याचा ताप वाढतच गेला. ताप कमी होत नसल्याने नातेवाईक चिंतेत होते. डॉक्टरांनी त्याच्या रक्ताची तपासणी केली असता त्याला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. तात्काळ येथील डॉक्टरांनी त्याला औरंगाबादला हलविण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे नातेवाईकांनी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बीड नगरपालिकेत निवडणूक झाल्यापासून काका-पुतण्याचा वाद या ना त्या कारणावरून सुरूच आहे. घंटागाडी, स्वच्छतेचे टेंडर, अपुरे मनुष्यबळ यासारख्या विविध कारणांवरून नेहमीच वाद होत आहे. या वादामुळे स्वच्छता विभागातील अधिकारी कर्मचारीही मनमोकळेपणाने काम करण्यास धजावत नाहीत. दबावातील कर्मचा-यांमुळे वेळेत स्वच्छता होत नाही. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वेळवर कचरा न उचलणे, नालीसफाई न होणे यासारख्या कारणांमुळे डासांची उत्पत्ती होण्यास मदत होत आहे. याच डासांमुळे नागरिकांना विविध साथरोग जडू लागले आहेत. यामुळे नागरिकांना सर्दी, ताप, खोकला, जुलाब, उलटी यासारख्या आजारांनी ग्रासले आहे. खाजगी रुग्णालयांसह शासकीय दवाखाने रुग्णांनी हाऊसफुल झाल्याचे सर्वत्र दिसत आहे. आरोग्य विभागही उपाययोजना करण्यास उदासीन असल्यास साथरोगात दिवसेंदिवस वाढ होत आहे.