अरुंद चौकाने घेतला एकाचा बळी
By Admin | Published: December 11, 2014 12:30 AM2014-12-11T00:30:48+5:302014-12-11T00:31:26+5:30
परभणी : शहरातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मालवाहू ट्रकच्या चाकाखाली चेंगरून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना १० डिसेंबर रोजी दुपारी ४़३० च्या सुमारास घडली़
परभणी : शहरातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मालवाहू ट्रकच्या चाकाखाली चेंगरून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना १० डिसेंबर रोजी दुपारी ४़३० च्या सुमारास घडली़ सिग्नल कार्यान्वित केल्यानंतर घडलेला हा पहिलाच अपघात असल्याने सिग्नल व्यवस्था व वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
१० डिसेंबर रोजी सायंकाळी श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ वसमत रस्त्याच्या बाजूने मालवाहू ट्रकच्या (क्रमांक जीजे-२/व्हीव्ही ०७८३) मागील चाकाखाली दुचाकी (क्रमांक एमएच २१/एके-११०) आली़ आणि त्यात चाकाखाली चेंगरून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला़ घटनेनंतर एकच धावपळ उडाली़ विशेष म्हणजे, पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या समोरच ही घटना घडली़ घटनेमुळे या भागातील वाहतूक ठप्प झाली़ बघ्यांची गर्दी झाली होती़ सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले़ गर्दी हटविण्याचा प्रयत्न पोलिस कर्मचाऱ्यांनी केला़
या अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव शेख महेबूब शेख यासिन (वय ५४) असे आहे़ ते मकदूमपुरा येथील रहिवासी असून, महानगरपालिकेच्या मलेरिया विभागात मुकदम म्हणून सेवेत असल्याची माहिती मिळाली़ घटनेनंतर मनपातील नगरसेवक, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
वाहतुकीला शिस्त लावण्यात शहर वाहतूक शाखा अपयशी ठरत आहे. मुळात पोलिसांकडून प्रयत्नच होत नाहीत. सिग्नलच्या ठिकाणी पुरेसे पोलिस कर्मचारी दिले जात नाहीत. परिणामी हे सिग्नल वाहतूक सुरळीत करण्यासाठी की विस्कळीत करण्यासाठी असा प्रश्न पडतो. पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळेच अशा प्रकारांना सामोरे जावे लागत आहे.