औरंगाबादच्या देवळाई चौकातील अपघातात गर्भवती महिलेचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 12:22 AM2018-08-08T00:22:06+5:302018-08-08T00:22:46+5:30
देवळाई चौकात वाहतूक सिग्नलवर पतीसह दुचाकीवर जाणाऱ्या एका गर्भवती महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे मागील चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. दुचाकीस्वार असलेला महिलेचा पती अपघातात दूरवर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : देवळाई चौकात वाहतूक सिग्नलवर पतीसह दुचाकीवर जाणाऱ्या एका गर्भवती महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे मागील चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. दुचाकीस्वार असलेला महिलेचा पती अपघातात दूरवर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.
अनिता विठ्ठल आल्हाट (२७, रा. सोनवाडी,ता. पैठण) असे मयत महिलेचे नाव आहे, तर तिचा पती विठ्ठल आल्हाट (३0) याला अपघातानंतर तातडीने खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. शहरातील खाजगी रुग्णालयात काही तपासणी करण्यासाठी दोघे पती-पत्नी पैठणहून शहरात आले होते. देवळाई चौकात एक अवजड ट्रक (एमएच ४८- एजी ६२१७) ची दुचाकी (एमएच २०- ईएम ८९०४) ला धडक लागली. दुचाकीवरील विठठ्ल आणि अनिता हे शिवाजीनगरकडून एमआयटीकडे निघाले होते. त्याचवेळी गांधेलीकडून एमआयटीकडे हा ट्रक चालला होता. ट्रक सिग्नलला थांबलेला होता. काही वेळाने सिग्नल सुरूझाल्याने ट्रक एमआयटीकडे जाण्यास निघाला. त्याचवेळी विठ्ठल आल्हाट हेदेखील देवळाई चौकातून दुचाकीवरून एमआयटीकडे वेगाने निघाले. मात्र, यावेळी त्यांचा वेगाचा अंदाज चुकला ट्रक आणि त्यांच्या दुचाकीची जोराने धडक झाली. दुचाकीवर बसलेल्या अनिता या ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली आल्या. ट्रक वेगाने असल्यामुळे आणि त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्या जागीच गतप्राण झाल्या, तर विठ्ठल हे दूर फेकले गेले.
पोलीस घटनास्थळी
वाहतूक शाखेचे निरीक्षक भारत काकडे, सहायक फौजदार वाय. ए. शेख, हवालदार ए. ए. मरकड आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सातारा पोलिसांनी ट्रक जप्त करून मृतदेह घाटीला पाठविण्यात आला. जखमी विठ्ठल मुरलीधर आल्हाट यास खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
वाहतूक खोळंबा
अपघातामुळे देवळाई चौकात आणि बीड बायपासवर दुतर्फा वाहतूक खोळंबली होती. वाहतूक शाखेने ती सुरळीत केली. पोलिसांनी आल्हाट यांच्या नातेवाईकांशी संपर्क करून अपघाताची माहिती दिली. अनिता यांचा मृतदेह घाटीत नेण्यात आला होता. घाटीतील शवागाराजवळ नातेवाईकांची गर्दी झाली होती. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. उशिरापर्यंत कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
बघे वाहतूक पोलीस आणि आरामाची जागा
देवळाई चौकात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी दररोज दोन-तीन पोलीस असतात. हे पोलीस देवळाई चौकातून रेल्वेपटरीकडे जाणाºया रस्त्यावर एका बाभळीच्या झाडाखाली आराम करताना दिसतात. याठिकाणी पोलिसांनी स्वत:च्या सोयीसाठी बाभळीच्या झाडावर हिरवी मॅट टांगून सावली केली आहे. चौकातील वाहतूक नियंंत्रणाचे काम सोडून पोलीस याठिकाणी गप्पा मारताना दिसतात.
मंगळवारी सकाळी देवळाई चौकात नागनाथ बनसोडे, सईद खान मेहमूद खान आणि दत्तू नागरे या तीन पोलीस कर्मचाºयांची ‘ड्यूटी’ होती. मात्र, यापैकी एकहीजण चौकात वाहतूक नियंत्रणासाठी नव्हता.लोकमत प्रतिनिधीने सायंकाळी चार वाजता या चौकात पाहणी केली असता पोलीस त्यांच्या नेहमीच्या सावलीच्या ठिकाणी दुचाकीवर बसून असल्याचे दिसले.