औरंगाबादेत खड्ड्याने घेतला विद्यार्थ्याचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:52 PM2018-03-11T23:52:45+5:302018-03-11T23:52:49+5:30
गल्लीत अंतर्गत सिमेंटचे गट्टू बसविताना गल्लीतील पाणी जाण्याचा मार्ग न सोडल्याने पाणी साचून तयार झालेल्या खड्ड्यात पडून दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास बायजीपुरा येथील गल्ली नंबर १७ मध्ये घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गल्लीत अंतर्गत सिमेंटचे गट्टू बसविताना गल्लीतील पाणी जाण्याचा मार्ग न सोडल्याने पाणी साचून तयार झालेल्या खड्ड्यात पडून दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास बायजीपुरा येथील गल्ली नंबर १७ मध्ये घडली. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मनपाचे अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला.
साहिल रशीद पठाण (१६, रा. गल्ली नंबर १९, बायजीपुरा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सिडको एन-६ येथील धर्मवीर संभाजी विद्यालयातील दहावीचा विद्यार्थी असून, तो याच विद्यालयात बोर्डाची परीक्षा देत होता. रविवारनिमित्त सुटी असल्याने तो आज घरीच होता. सकाळी दहा वाजेच्या सुमारास तो बायजीपुरा येथील गल्ली नंबर १७ मध्ये राहणाºया आजीकडे पायी जात होता. ज्या दिवशी गल्लीतील नळाला पाणी येईल, त्या दिवशी या गल्लीतील जलीलभाई यांच्या गिरणीसमोर मोठे पाण्याचे डबके साचते. नळाला पाणी आल्यानंतर गल्लीतून वाहणाºया पाण्याला वाहून जाण्यासाठी असलेली नाली बुजविण्यात आल्याने पाण्याचे मोठे डबके साचते. आज सकाळी साहिल हा डबके ओलांडून पुढे जात असताना त्याचा पाय घसरला आणि तो तेथील पाण्यातील ड्रेनेज चेम्बरच्या ढाप्यावर आदळला. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो पाण्यात पडला. तेथून जाणाºया लोकांनी त्यास उचलले आणि तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. अपघात विभागातील डॉक्टरांनी साहिल यास तपासून मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच साहिलचे नातेवाईक आणि मित्र मोठ्या संख्येने तेथे दाखल झाले. साहिलचे वडील वाहनचालक असून आई गृहिणी आहे. त्यास एक मोठा भाऊ आणि लहान बहीण आहे. याविषयी जिन्सी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
गट्टू टाकताना बुजविली सांडपाण्याची नाली
साहिलच्या मृत्यूला गल्ली नंबर १७ मध्ये गट्टू बसविण्याचे काम करणाºया मनपाचा ठेकेदार आणि संबंधित अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. ठेकेदाराने गट्टू बसविताना गल्लीतून वाहणारे पाणी जाण्यासाठी असलेली नाली बुजविली. पाणी जाण्यास मार्गच नसल्याने गल्लीत मोठे डबके साचले.