निष्काळजीपणाचे बळी! लोंबकळणाऱ्या वायरमधून बसला विजेचा धक्का; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 11:22 PM2022-07-20T23:22:59+5:302022-07-20T23:24:52+5:30
कन्नड येथील हिवरखेड शिवारात ८ जुलै रोजी विद्युतवाहिन्या जोडताना विजेचा धक्का बसून चार मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना दोन सख्ख्या भावांचा अशाच प्रकारे मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
शिऊर (औरंगाबाद): बोअरवेलसाठी घेतलेले वायर बैलांच्या शिंगात अडकून बैलगाडीत वीजप्रवाह उतरून बसलेल्या धक्क्याने दोन सख्या वृद्ध भावांचा आणि बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान मौजे बायगाव (तालुका वैजापूर) येथील चेळेकर शेत वस्ती परिसरात घडली. साहेबराव गणपत चेळेकर आणि बाबुराव गणपत चेळेकर अशी मृत भावांची नावे आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की, वैजापुर तालुक्यातील मौजे बायगाव येथील चेळेकर वस्तीवर एकत्र कुटुंब राहत असलेले साहेबराव गणपत चेळेकर हे बुधवारी संध्याकाळी पाऊस उघडल्यानंतर शेतातील कामे उरकून जुना बायगाव- देवगाव रंगारी या गाडी वाटीने लोखंडी एका बैलाच्या बैलगाडीने घरी परतत होते. या रस्त्यावरून एका शेतकऱ्याने बोअरवेलसाठी विनापोल केबल टाकले होते. हे केबल बैलाच्या शिंगात अडकल्याने त्यातील वीजप्रवाह बैलगाडीत उतरला. विजेच्या धक्क्याने प्रथम बैलगाडीस जुंपलेला बैल ठार झाला. त्यानंतर बैलगाडी चालवणारे साहेबराव विजेच्या धक्क्याने ठार झाले.
दरम्यान, मोठा आवाज झाल्याने बाजूस काम करत असलेले साहेबराव यांचे भाऊ बाबुराव लागलीच मदतीला धावले. मात्र, यावेळी वीजप्रवाह उतरलेल्या बैलगाडीस स्पर्श झाल्याने बाबुराव यांचाही जागीच मृत्यू झाला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना हे लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरडा करत इतर सहकाऱ्यांच्या मदतीने तात्काळ वीज पुरवठा खंडित केला.
घटनेची माहिती मिळताच शिवुर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदिप पाटील, पोलिस उपनिरीक्षक ऐ.जे.नागटिळे, पोलिस कर्मचारी जाधव, पवार यांनी देवगाव रंगारी ग्रामीण रुग्णालयात येऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद शिवुर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दोघेही मयत भांवाची गुरूवारी उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, मयत साहेबराव चेळेकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,दोन मुली सुना नातु पणतु असा तर मयत बाबुराव चेळेकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. कन्नड येथील हिवरखेड शिवारात ८ जुलै रोजी विद्युतवाहिन्या जोडताना विजेचा धक्का बसून चार मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना दोन सख्ख्या भावांचा अशाच प्रकारे मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.