स्वाईन फ्लूने घेतला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:20 AM2017-10-14T00:20:59+5:302017-10-14T00:20:59+5:30
बीडसह पाटोदा, वडवणी, गेवराई तालुक्यांमध्ये डेंग्यू आणि कावीळच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड :मागील काही दिवसांपासून दूषित पाण्यासह घाणीच्या ढिगा-यांमुळे आणि तुंबलेल्या नाल्यांमुळे रोगराईचा प्रसार होत असून, बीडसह पाटोदा, वडवणी, गेवराई तालुक्यांमध्ये डेंग्यू आणि कावीळच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, परळी तालुक्यातील धारावती तांडा येथील एका २५ वर्षीय तरुणाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ४० पेक्षा जास्त रुग्ण डेंग्यूची लागण झालेले तर ३० पेक्षा जास्त रुग्ण मलेरियाची लागण झालेले आढळले आहेत. विशेषत: गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये साथरोगांचा फैलाव वाढला आहे. शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांमध्ये या आजारांच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत असून, आरोग्य विभागानेही तातडीने साथरोग नियंत्रणासाठी पावले उचलण्यात आली आहेत.
बीड शहरातील खाजगी रुग्णालयात या आजाराचे उपचार घेणा-यांमध्ये बालकांचे प्रमाण मोठे आहे तर चिकुनगुनियासदृश्य आजार वाढत आहे. गेवराई तालुक्यातील गोदावरी काठच्या गावांमध्ये दूषित पाण्यामुळे कावीळ फोफावत आहे.