Video: 'पैसे द्या म्हणून बोर्ड लावा', आमदार बागडे अधिकाऱ्यावर संतापले; कार्यालयात ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 06:31 PM2023-06-22T18:31:14+5:302023-06-22T18:35:50+5:30

प्रलंबित फाईल मंजुर झाल्याशिवाय फुलंब्री पंचायत समितीमधून उठणार नाही असा पवित्रा आ हरिभाऊ बागडे यांनी घेतला आहे

Video: 700 files of farmers pending; MLA Haribhau Bagde was angry, the group development officer was scolded in Fullanbri | Video: 'पैसे द्या म्हणून बोर्ड लावा', आमदार बागडे अधिकाऱ्यावर संतापले; कार्यालयात ठिय्या

Video: 'पैसे द्या म्हणून बोर्ड लावा', आमदार बागडे अधिकाऱ्यावर संतापले; कार्यालयात ठिय्या

googlenewsNext

फुलंब्री : येथील पंचायत समिती कार्यालयात मागील एक वर्षापासून दाखल केलेल्या सिंचन विहीर व गोठ्याच्या तब्बल ७०० फाईल धूळखात पडून आहेत. या फाईल मंजूर होत नसल्याने मेटाकुटिला आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला आमदार हरिभाऊ बागडे धावून आले. आज दुपारी पंचायत समिती कार्यालयात धाव घेत आ. बागडे यांनी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांना प्रलंबित फाईलबाबत जाब विचारत चांगलीच खरडपट्टी काढली. 

विहीर मंजुरीसाठी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी लाच मागितल्याने सरपंचाने पंचायत समिती कार्यालय बाहेर नोटा फेकल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. त्यानंतर येथील कारभार चव्हाट्यावर आला. शेतकऱ्यांनी तक्रारी करत वर्क ऑर्डर आलेल्या फाईल देखील गटविकास अधिकारी अडवून ठेवत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. त्यानंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांना निलंबित करणार असल्याचे जाहीर केले. मात्र, त्या अद्यापही कर्तव्यावर आहेत. राज्यभर गाजलेले नोटांची उधळणे प्रकरण, मंत्री महाजन यांनी दखल घेऊन देखील कवडदेवी यांचा कारभार सुधारला नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला. काही शेतकऱ्यांनी याबाबत आमदार हरिभाऊ बागडे यांना तक्रार केली. आ. बागडे यांनी दखल घेत आज पंचायत समिती कार्यालय गाठले. येथे गटविकास अधिकारी कवडदेवी यांना प्रलंबित फाईलबाबत जाब विचारला, मागील तीन तासांपासून आ. बागडे यांनी येथे ठिय्या दिला आहे. 

थेट मंत्री गिरीश महाजन यांना लावला फोन
संतापलेल्या आ. बागडे यांनी थेट ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना फोन लावला. गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांच्याबद्दल आ. बागडे यांनी मंत्री महाजन यांना माहिती दिली. त्यानंतर मंत्री महाजन यांनी जिल्हा परिषद सीईओ याना यात लक्ष घाला, असा आदेश दिल्याची माहिती आहे. दरम्यान, प्रलंबित फाईल मंजूर झाल्याशिवाय कार्यालयातून उठणार नाही, असा पवित्रा आ. बागडे यांनी घेतल्याने जिल्हा परिषदेची यंत्रणा कामाला लागली आहे.

पैसे द्या म्हणून बोर्ड लावा
पगार घेतात तर फाईलवर सह्या करत नाहीत, कर्तव्याचा भाग नाही का ? असा जाब आ. बागडे यांनी गटविकास अधिकारी कवडदेवी यांना विचरला. तसेच तुम्ही जाणीवपूर्वक काम करत नाहीत.  पैसे हवे असतील तर कार्यालयाबाहेर तसा बोर्ड लावा, असा संताप आ. बागडे यांनी व्यक्त केला. आ. बागडे यांचा हा अवतार पाहून जिल्हा परिषद यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाचा आमदार, माजी विधानसभा अध्यक्ष यांना कामे होत नाहींत म्हणून अधिकाऱ्यांच्या विरोधात ठिय्या देण्याची वेळ येत असल्याने हा विषय चर्चेचा ठरत आहे.

Web Title: Video: 700 files of farmers pending; MLA Haribhau Bagde was angry, the group development officer was scolded in Fullanbri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.