Video: ग्रँड एन्ट्री! पहिल्यांदाच शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची उंटावरून काढली मिरवणूक
By राम शिनगारे | Published: June 15, 2023 08:45 PM2023-06-15T20:45:47+5:302023-06-15T20:51:15+5:30
ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत; महापालिकेच्या शाळेत मुख्याध्यापकांचा उपक्रम
छत्रपती संभाजीनगर : ढोल ताशांच्या गजरात उंटावर बसवून पहिल्यांदाच शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. हा उपक्रम छत्रपती संभाजीनगर शहरातील महापालिकेच्या चिकलठाणा भागातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक देवेंद्र सोळंके यांनी राबवला.
शाळेत येण्यापूर्वी सुरुवात ग्रंथ दिंडीने करण्यात आली. त्यातच उंटावर बसून चिमुकल्या नवप्रवेशीत विद्यार्थ्यांची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अतिशय चैतन्य आणि उत्साह विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते नवागतांचे फुले, फुगे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तक वाटपासह १० वी च्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकाही देण्यात आल्या.
छत्रपती संभाजीनगर इथं ढोल ताशांच्या गजरात उंटावर बसवून शाळकरी विद्यार्थ्यांची मिरवणूक, महापालिकेच्या शाळेचा उपक्रम #Maharashtrapic.twitter.com/53NBHG47kY
— Lokmat (@lokmat) June 15, 2023
यावेळी शालेय समिती उपाध्यक्ष रामेश्वर कोरडे , शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ थोरे, शालेय समिती सदस्या निशा मगरे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन संगीता चव्हाण, आभार अर्चना भारद्वाज यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक सय्यद खिजर, राजपूत, वाघ, कापुरे, पठाडे, पठाण यांच्यासह शिक्षीका मालोदे, गणोरकर, तारो, भिंगोले, शिंदे यांनी परिश्रम घेतले.