Video: गॅस सिलेंडरच्या गोडाऊनपासून अवघ्या २०० फुटावर धावत्या ट्रकने घेतला पेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 19:51 IST2023-04-17T19:45:52+5:302023-04-17T19:51:02+5:30
धुळे - सोलापूर महामार्गावरील आडूळजवळची घटना

Video: गॅस सिलेंडरच्या गोडाऊनपासून अवघ्या २०० फुटावर धावत्या ट्रकने घेतला पेट
आडूळ (छत्रपती संभाजीनगर): धुळेहून - बीडकडे जाणाऱ्या एका ट्रकने आज दुपारी २: ३० वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. सुदैवाने चालक ट्रकमधून वेळीच बाहेर पडल्याने बालंबाल बचावला.
धुळे येथून एक मालवाहतुक ट्रक ( टि एन ५२, ए ए २२४७ ) हा बीड कडे फरशी घेऊन जात होता. दुपारी आडूळ शिवारात धावत्या ट्रकच्या कॅबिनमध्ये आग लागली. प्रसंगावधान राखून ट्रक महामार्गावर उभा करत चालकाने खाली उडी घेतली.
आग विझविण्याची यंत्रणा नसल्याने महामार्गावर सर्वांसमोर ट्रक जाळून खाक झाला. महार्गावर यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून काही चालकांनी वाहन जागीच उभे केले. माहिती मिळताच महामार्ग पोलिस उपनिरीक्षक प्रकाश जाधव, कर्मचारी सुनिल ठोंबरे, नारायण ससे, प्रमोद गरड यांनी घटनास्थळी धाव घेतली. महार्गावरील वाहतूक आडूळ गावातून वळून पोलिसांनी सुरळीत केली. काही वेळानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविली.
छत्रपती संभाजीनगर: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आडूळ जवळ एक धावता ट्रक अचानक पेटला. pic.twitter.com/LGHr5wSQzE
— Lokmat (@lokmat) April 17, 2023
गॅसचे गोडाऊन होते फक्त २०० फुटावर
पेटत्या ट्रकपासून एचपी गॅस एजन्सीचे गोडाऊन फक्त २०० फुट अंतरावर होते. गोडाऊनच्या कर्मचाऱ्यांनी सावधानता बाळगत तत्काळ सिलेंडरने भरलेली वाहने तेथून हटवली.