बीड पोलिसांचा ‘तो’ व्हिडिओ लोकप्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:01 AM2017-11-06T00:01:26+5:302017-11-06T00:01:34+5:30
हरवलेल्या मुलाला सीसी टीव्हीच्या माध्यमातून आईपर्यंत पोहोचविले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी हायटेक यंत्रणा राबविली. त्यामुळे त्या चिमुकल्याला आई, तर आईला पोटचा गोळा भेटला. हा व्हिडिओ पाहून अनेकांना गहिवरून आले
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : हरवलेल्या मुलाला सीसी टीव्हीच्या माध्यमातून आईपर्यंत पोहोचविले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी हायटेक यंत्रणा राबविली. त्यामुळे त्या चिमुकल्याला आई, तर आईला पोटचा गोळा भेटला. हा व्हिडिओ पाहून अनेकांना गहिवरून आले. खाकीतील माणुसकीचे दर्शन घडविणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तेवढाच लोकप्रिय ठरत आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी १८ चौकांत ६० सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. याच्यावर आठवड्यातील २४ तास नजर ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षात विशेष पोलीस नियंत्रण कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या सीसीटीव्हीमुळे शहरातील अपघात, विस्कळीत वाहतूक, महिलांची छेडछाड, साखळीचोर आदींची माहिती तात्काळ मिळत असून, गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी सीसी टीव्ही कॅमे-यांची मोलाची मदत होत आहे.
आईपासून दुरावलेल्या मुलाचा शोध घेण्यात सीसी टीव्हीमुळे मदत झाली. यानंतर नातेवाईकांकडून पोलिसांचा सत्कार केला जातो. खाकीतील माणुसकीचे दर्शन घडविण्याबरोबरच कर्तव्यतत्पर पोलिसांची ओळख जनसामान्यांना होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ही बाब समोर आली. या व्हिडिओमध्ये ख-याखु-या पोलिसांनी उत्कृष्ट भूमिका बजावली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पो.नि. दिनेश आहेर व त्यांचे सहकारी, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या फौजदार दीपाली गित्ते, एस.एस.भारती, रेखा गोरे, आयुष काळे (मुलगा), रंजना सांगळे, गांधारी मस्के, निशा घुले, सोनाली चौरे, सतिष बहिरवाळ, शेख शमीम पाशा, राठोड आदींनी भूमिका पार पाडली आहे.
साखळी चोरांपासून सावध राहण्यासंदर्भातच्या व्हिडिओमध्ये चिडीमार पथकाच्या मीरा रेडेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. चोरांना सीसीटीव्हीमार्फत शोधण्यासाठी पो.नि. दिनेश आहेर यांच्यासह पथकाने यशस्वी काम केले.