Video: वाळूज उद्योग नगरीतील एनआरबी बेरिंग कंपनीत आग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 12:59 PM2023-05-08T12:59:28+5:302023-05-08T12:59:57+5:30
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
- मेहमूद शेख
वाळूजमहानगर: वाळूज उद्योग नगरीतील एनआरबी बेरिंग्स या कंपनीला आज सोमवार (दि.८) सकाळी ६ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत गोदामात ठेवलेले साहित्य जळून खाक झाले असून सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
कंपनीच्या गोदामात ठेवलेल्या साहित्याला आग लागल्याने कंपनीतील कामगार व सुरक्षारक्षक यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने बजाज ऑटो, गरवारे व वाळूज अग्निशमन दलाच्या तीन बंब दाखल झाले. तिन्ही अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आग आटोक्यात येत नसल्याने खाजगी टँकरने पाणी आणून आगीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न दुपारपर्यंत सुरू होते. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता कंपनी प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे.
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना रोखले
या आगीची माहिती मिळताच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी माहिती घेण्यासाठी गेले असता त्यांना सुरक्षा रक्षकांनी कंपनीच्या प्रवेश द्वारासमोर रोखून धरले. जवळपास तीन तास थांबूनही कंपनी व्यवस्थापनाकडून प्रसार माध्यमांना माहिती न दिल्याने आगीत किती नुकसान झाले याची अधिकृत माहिती कळू शकली नाही.