Video: वाळूज उद्योग नगरीत चटई कंपनीला भीषण आग, २०० कामगार सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 01:45 PM2023-01-16T13:45:09+5:302023-01-16T13:46:07+5:30
शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज असून यात लाखोंची हानी
- शेख मेहमूद
वाळूजमहानगर: वाळूज उद्योग नगरातील जोगेश्वरी शिवारातील साहिल प्लास्टिक प्रा.लि. या चटई कंपनीला आज सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास भिषण आग लागली होती. या आगीत कंपनीतील मशीन व उत्पादित माल भस्म झाला. शॉर्ट सर्किट ने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
जोगेश्वरी गावालगत असलेल्या साहिल प्लास्टिक या कमानीत चटईचे उत्पादन करण्यात येते. या कंपनीत महिला व पुरुष मिळून जवळपास ४०० कामगार काम करतात. आज सोमवारी सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये जवळपास २०० कामगार कामासाठी आले होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास कंपनीच्या पाठीमागील बाजूने धूर व आगीचे लोळ दिसून आल्याने कंपनीतील कामगार व कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र कंपनीतील प्लास्टिक मटेरियलने पेट घेतल्याने क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले.
VIDEO: औरंगाबादमध्ये वाळूज औद्योगिक महानगरातील साहिल प्लास्टिक कंपनीला भीषण आग pic.twitter.com/IPj0XYrenm
— Lokmat (@lokmat) January 16, 2023
आग लागल्यानंतर कंपनीतील सर्व कामगारांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. अवघ्या काही वेळातच आग कंपनीच्या चोहोबाजूंनी पसरल्याने कंपनीतील सर्व तयार माल व यंत्र सामुग्री आगीत भस्मसात झाला. या आगीची माहिती मिळताच वाळूज व बजाज ऑटो कंपनीचे दोन अग्निशमन बंब व खाजगी टँकर च्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आग विझविण्यासाठी जोगेश्वरी सरपंच गजानन बोंबले, उपसरपंच प्रवीण दुबिले, सदस्य मीना पनाड, समीर शेख, हरिदास चव्हाण आदींनी आग विझविण्यासाठी मदत केली.