Video: परतीच्या पावसाचे थैमान; गंगापूरात ढगफुटी सदृश्य पावसाने पिकांचे अतोनात नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 20:21 IST2022-10-20T20:21:01+5:302022-10-20T20:21:58+5:30
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सतीश सोनी यांनी केली पाहणी.

Video: परतीच्या पावसाचे थैमान; गंगापूरात ढगफुटी सदृश्य पावसाने पिकांचे अतोनात नुकसान
गंगापूर : तालुक्याच्या सिद्धनाथ वाडगाव मंडळात गुरुवारी (२०) रोजी सकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला;या पावसात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून उभे सोयाबीनचे व कापसाचे पीक पाण्यात गेले आहे. शेतकरी संकटात सापडला आहे.प्रशासनाने व विमा कंपन्यांनी तात्काळ दखल घेत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्ग करत आहे.
सिद्धनाथ वाडगाव मंडळात कनकोरी,वजनापुर,शंकरपुर, सिद्धनाथ वाडगाव, बूट्टॆ वाडगाव, घोडेगाव, कोळघर परिसरात गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून ढगांच्या गडगडाटासह जवळपास चार तास मुसळधार पाऊस झाला. या ढगफुटी सदृश्य पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापसाचे बोंड अक्षशः सडली आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने फुलवलेल्या शेतशिवारावर अस्मानी संकटाने कहर केला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे डोळ्यांदेखत परतीच्या मुसळधार पावसाने नुकसान होताना पाहणे शेतकऱ्यासमोर आले आहे.
तहसीलदार यांनी केली पाहणी
गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव मंडळात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सतीश सोनी यांनी शंकरपुर, वजनापुर येथे दुपारी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.